Pune District : कुरुळी-निघोजे रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य
Pune District : कुरुळी, निघोजे तसेच परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. कंपनीच्या बसगाड्या, जड वाहने, दुचाकी, चारचाकी वाहनांसह शेतकरी व ग्रामस्थांचीही मोठी वर्दळ या मार्गावर असते.

चिंबळी : कुरुळी-निघोजे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात जड वाहनांची वर्दळ वाढल्याने वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. रस्त्यावर पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनांचा वेग मंदावत असून, वाहतुकीचा खोळंबा होत असल्याने वाहनचालक, कामगार, शेतकरी, विद्यार्थी आणि ग्रामस्थांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कुरुळी, निघोजे तसेच परिसरातील औद्योगिक क्षेत्रामुळे या रस्त्यावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. कंपनीच्या बसगाड्या, जड वाहने, दुचाकी, चारचाकी वाहनांसह शेतकरी व ग्रामस्थांचीही मोठी वर्दळ या मार्गावर असते. मात्र, रस्त्यावर ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीचा वेग मंदावून कोंडीची समस्या निर्माण होत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याचे काम सध्या सुरू असले तरी ते अत्यंत संथगतीने सुरू असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. त्यामुळे रस्त्याचे काम तातडीने आणि युद्धपातळीवर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराने या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन कामाला गती द्यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन रॅली काढत रस्त्याच्या दुरवस्थेविरोधात घोषणाबाजी केली. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करून वाहतूक सुरळीत करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. रस्त्याची दुरवस्था आणि वाहतूक कोंडीची समस्या तातडीने सोडवली नाही, तर नागरिकांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासन आता या रस्त्याच्या कामाला कितपत गती देते, याकडे कुरुळी, निघोजे आणि परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे.
रस्त्यावरील खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. रस्त्याचे सुरू असलेले काम संथगतीने होत असून, संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन काम युद्धपातळीवर पूर्ण करावे. अन्यथा नागरिकांच्या वतीने मोठे आंदोलन उभारावे लागेल, याची शासन-प्रशासनाने नोंद घ्यावी.
-डॉ. अनिल काळे





