प्रभात वृत्तसेवा पिंपळे गुरव – स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपये खर्चून बांधण्यात आलेले सिमेंट काँक्रीट रस्ते अवघ्या वर्षभरातच उखडू लागले आहेत. सांगवी फाट्यावरून सांगवीकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे व धोकादायक खड्डे निर्माण झाले असून, वाहन चालकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह पादचाऱ्यांना देखील अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्यात पाणी साचल्यामुळे खड्डे दिसत नाहीत. त्यामुळे अचानक होणाऱ्या अपघातांची शक्यता वाढली आहे. काही ठिकाणी रस्ता खचल्यामुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. परिणामी मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होऊन नागरी जीवन विस्कळीत झाले आहे. स्मार्ट सिटीचे रस्ते केवळ दिखाऊ असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. प्रत्यक्षात रस्त्यांची गुणवत्ता अत्यंत निकृष्ट असल्याचे या परिस्थितीतून स्पष्ट होते. सामाजिक कार्यकर्ते कैलास बनसोडे यांनी प्रशासनाकडे वेळोवेळी तक्रारी करूनही दुरुस्ती करण्यात आलेली नाही. तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी दिला आहे.