राहू, – गेल्या तीन वर्षांपासून प्रतीक्षित असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकांना अखेर मुहूर्त मिळण्याची शक्यता आहे. विधानसभेच्या निवडणुका होऊन आता सरकार स्थापन होत आहे. त्यामुळे राज्यासह दौंड तालुक्यातील इच्छुकांचा जीव भांड्यात पडला आहे. करोना, ओबीसी आरक्षण आदींमुळे इच्छुकांनी अक्षरशः निवडणुकांची आशा सोडून दिली होती. परंतु प्रशासकीय हालचाली व सरकार स्थापनेमुळे विषय मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मागील निवडणुकीपेक्षा यावेळी दौंडमध्ये जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य वाढ होण्याची शक्यता निर्माण झाल्यामुळे इच्छुकांची संख्या देखील वाढणार आहे. मागील जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये राहू गट व गण सोडला तर पंचायत समितीवर व जिल्हा परिषदेच्या जागांवर राष्ट्रवादी काँग्रेस, माजी आमदार रमेश थोरात यांचे एकहाती वर्चस्व होते. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसकडून इच्छुकांची संख्याही जास्त राहणार आहे. परंतु विधासभा निवडणुकीत थोरात यांचा पराभव झाल्याने काहीं प्रमाणात फरक पडू शकतो. तरी राष्ट्रवादी काँग्रेससाठी उमेदवारी निश्चित करणे जरा कठीण जाणार आहे. त्यातच माजी आमदार थोरात यांचे चिरंजीव गणेश थोरात हे देखील राजकारणात सक्रिय झाले आहेत. विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी चुणूक दाखविली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेच्या आखाड्यात उतरणार ही शक्यता आहे. फक्त ते कोणत्या गटातून उमेदवारी घेतात, याकडे लक्ष वेधले आहे. समोरील बाजूस भाजपाने देखील पूर्णपणे तयारी केली आहे. विद्यमान आमदार हे भाजपचे असल्यामुळे त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. आमदार राहुल कुल यांनी विधानसभा विजयाची हॅट्टिक केल्यामुळे झेडपी निवडणुकीत भाजप पूर्ण ताकदीने उतरणार आहे. त्यामुळे राष्ट्रवादीला (शरद पवार गट) ही निवडणूक सोपी जाणार नाही. भाजपाने देखील प्रत्यक्ष संपर्क व जनतेची कामे मार्गी लावण्यावर भर, कोट्यवधींचा निधी मतदारसंघात दिला आहे. त्यामुळे भाजपाचे संघटन चांगले आहे. लोकसभेचा व विधासभेचा निवडणुकांवर काही परिणाम होऊ शकतो का, याची चर्चा झडत आहे. लोकसभा निवडणुकीत खासदार सुप्रिया सुळे यांना तालुक्यातून मिळालेली 24 हजार मतांची आघाडी ही विधानसभेला राहिली नाही. विधानसभेला मिळालेली आघाडी ही स्थानिक स्वराज्य संस्थापर्यंत टिकून राहिल, याची खात्री देता येत नाही. तरुणांना संधी मिळणे महत्वाचे वाढलेल्या जागांचा फायदा हा दोन्ही पक्षातील तरुण कार्यकर्त्याना झाला पाहिजे, अशी सर्वसामान्यांची इच्छा आहे. परंतु तरुण हे प्रस्थापितांबरोबरच सामान्यवर्गातील व पक्षांसाठी तन, मन धनाने समर्पित होणारे असावेत. ते पैशांच्या जोरावर लादलेले नसावेत, अशी प्रतिक्रिया उमटत आहे.