बटाट्याचे दर घसरले 9 रुपयांवर, शेतकरी आणि शीतगृह मालक आर्थिक संकटात

कोलकत्ता – बटाट्याचे उत्पादन मागणीपेक्षा जास्त झाले आहे. अशा परिस्थितीत बटाट्याचे भाव पडत आहेत. बटाट्याच्या किरकोळ आणि घाऊक किमतीतील तफावत वाढली आहे. यामुळे बटाटा उत्पादक शेतकर्यांचे व बटाटा साठविणार्या शीतगृहाचे नुकसान होत आहे. शेतकर्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी सरकारने हस्तक्षेप करण्याची मागणी बटाटा उत्पादकांनी केली आहे.
बटाट्याच्या किमती कोसळल्यामुळे केवळ शेतकर्यांचे नुकसान होत नाही तर या बटाट्याची साठवणूक करणार्या शीतगृहाचेही त्याच प्रमाणात नुकसान होत आहे असे शीतगृहांच्या संघटनेचे अध्यक्ष सुनील कुमार राणा यांनी सांगितले. पश्चिम बंगालमध्ये बटाट्याचे उत्पादन इतके जास्त झाले आहे की सध्या शीतगृहाकडे 70.85 लाख टन इतका बटाटा पडून आहे. त्यामध्ये नवीन आलेल्या दहा लाख टन बटाट्याचा समावेश आहे. पश्चिम बंगाल सरकारने अंतरराज्य बटाटा वाहतुकीला बंदी घातल्यामुळे सर्व बटाटा शीत गृहामध्ये साठविला जात असल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारपेठेतील भाव आणि उत्पादन मूल्यातील तफावत वाढत चालले आहे. ही तफावत दूर करण्यासाठी सरकारने प्रयत्न करण्याची गरज आहे. अन्यथा शेतकरी बटाटा उत्पादन बंद करतील. त्यामुळे भविष्यात बटाट्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. बटाट्याच्या किमती कोसळल्यानंतर हमीभावाने अकरा लाख टन बटाटा खरेदी करण्याचे आश्वासन राज्य सरकारने दिले होते. मात्र ते अजून पाळलेले नाही.
घाऊक बाजारात किमती कोसळल्या –
पश्चिम बंगाल सरकारने बटाट्यासाठी किमान आधारभूत किंमत 15 रुपये प्रति किलो इतकी ठेवली आहे. मे महिन्यामध्ये बटाट्याची किंमत पंधरा रुपये प्रति किलो या पातळीवर होती. मात्र नंतर या किमती वेगाने कमी होत आहेत. बटाट्याचे उत्पादन वाढल्यामुळे बटाट्याचा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी होऊन केवळ 9 रुपये प्रति किलो झाला आहे. याचा परिणाम किरकोळ बाजारावर तेही होत आहे.





