आरे वृक्षतोडीवरील स्थगिती कायम

सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी जानेवारीत
नवी दिल्ली : मुंबईतील मेट्रोसाठी उभारण्यात येत असलेल्या आरे कॉलनीतील वृक्षतोडीविरोधातील स्थगिती सर्वोच्च न्यायालयाने आज कायम ठेवली आहे. महाराष्ट्रात नवीन सरकार स्थापन झाले असून ते मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागा शोधात आहे, असा युक्तिवाद याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी केला. त्यानंतर न्यायालयाने सुनावणी जानेवारीपर्यत तहकुबी ठेवली.
मेट्रो कारशेडसाठी आरे कॉलनीतील हजारो झाडे तोडण्यात आली. त्याविरोधात वृक्षप्रेमींनी नाराजी व्यक्त केली होती. स्थानिकांसह मुंबई आणि परिसरातील नागरिक आणि वृक्षप्रेमींनी आंदोलनही केले होते. आरेतील वृक्षतोडीचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यत गेले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या विशेष खंडपीठाने 7 ऑक्टोबरला आरेतील वृक्षतोडीला तूर्तास स्थगिती दिली होती. तसेच आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांची सुटका करण्यात यावी, असे आदेशही न्यायालयाने पोलिसांना दिले होते. आतापर्यंत किती झाडे तोडली त्याचा तपशीलही देण्यात यावा, असे निर्देशही न्यायालयाने दिले होते.
आरेतील वृक्षतोडीवर 21 ऑक्टोबरलाही सुनावणी झाली होती. त्यावेळी न्यायालयाने वृक्षतोडीवरील मनाई आदेश कायम ठेवताना “जैसे थे’ स्थिती 15 नोव्हेंबरपर्यंत कायम ठेवली होती. आरे कॉलनीत कुठेही सध्या वृक्षतोड किंवा छाटणी होत नसल्याचे निवेदन महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सुनावणीवेळी केले. त्यानंतर न्यायमूर्ती अरुण मिश्रा व न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने सर्व याचिकांवरील पुढील सुनावणी होईपर्यंत आधीचा आदेश कायम ठेवला होता.





