Kerala News : केरळमधील सांस्कृतिक कार्यक्रमात झळकले हमासच्या नेत्यांचे पोस्टर

पलक्कड : केरळमधील पलक्कड येथे एका सांस्कृतिक महोत्सवादरम्यान पॅलेस्टीनमधील संघटना हमासच्या नेत्यांचे फोटो प्रदर्शित करण्यात आले. हा महोत्सव दरवर्षी आयोजित केला जातो. रविवारी महोत्सवाचा समारोप समारंभ पार पडला. दरम्यान, या पोस्टर प्रकरणामुळे वातावरण तापले आहे.
केरळमधील सीपीआय(एम) सरकारच्या पाठिंब्याने आणि मदतीने कट्टरपंथी घटक आणि देशविरोधी संघटना कार्यरत असल्याचा आरोप भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी केला आहे व राज्य सरकारवर टीका केली आहे. तत्पूर्वी, भाजप नेत्याने त्यांच्या पोस्टमध्ये या कार्यक्रमाचा व्हिडिओ पोस्ट केला असून त्यात लिहिले की, एक वर्षापूर्वी, भाजपने केरळमध्ये हमास नेत्याच्या उपस्थितीत झालेल्या एका रॅलीविरुद्ध इशारा दिला होता, मात्र तेव्हा राज्यातील एलडीएफ सरकारने कोणतीही कारवाई केली नाही.
त्यांनी पुढे लिहिले की, हजारो लोकांना मारणाऱ्या दहशतवाद्यांचा आता पलक्कडमध्ये गौरव केला जातो. इस्माईल हानिया आणि याह्या सिनवार यांचे फोटो हत्तींवर लावण्यात आले आणि एक परेड काढण्यात आली, जिथे एक मंत्री आणि माजी काँग्रेस आमदार देखील उपस्थित होते. यातून कोणता संदेश पाठवला जात आहे? मुख्यमंत्री विजयन गप्प का आहेत? त्यांनी कारवाई करावी किंवा राजीनामा द्यावा.





