सावधान! पुढील साथ ही अधिक ‘नरसंहार’ करणारी असेल; करोनाची लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञाचा इशारा

वॉशिंग्टन – पुढील साथ ही अधिक नरसंहार करणारी असेल, त्यासाठी सज्ज राहावे लागेल, असे प्रतिपादन ऑक्सफोर्ड-ऍस्ट्राझेन्का लसीच्या निर्मात्या सराह गिलबर्ट यांनी केले.
रिचर्ड डिम्बलेबाय व्याख्यानमालेत बोलताना गिलबर्ट म्हणाल्या, करोना साथीच्या मिळालेल्या धड्यावर शिकत जगाने उभे राहिले पाहिजे. मात्र, विषाणूंनी आमच्या जीविताला धोका निर्माण करण्याची ही काही अखेरची वेळ नाही. सत्य हे आहे की यापुढील साथ अधिक घातक असेल. ती अधिक संसर्गजन्य किंवा अधिक प्राणहानी घडवणारी किंवा दोन्ही असणारी असू शकेल.
आपण सर्व जण ज्या परिस्थितीला सामोरे गेलो आहोत किंवा जात आहोत आणि झालेल्या बेसुमार आर्थिक नुकसानीचा विचार करत आहोत, त्यातून हाती एक माहिती हाती शिल्लक राहते, ती म्हणजे, साथीची तयारी करण्यासाठी आपल्याकडे निधी उपलब्ध नव्हता. यातून आपण केलेली प्रगती आणि कमावलेले ज्ञान वाया जाऊ नये, असे त्या म्हणाल्या.
ऑक्सफर्ड – ऍस्ट्राझेन्जा लसीला जगात सर्वात आधी इंग्लंडमध्ये वापरास परवानगी मिळाली. सध्या या लसीचा वापर जगातील 170 देशांत होत आहे. ही लस तुलनेने स्वस्त आहे. त्याचा पुरवठा अन्य लसींच्या तुलनेत सहजतेने करता येतो. त्यामुळेच त्याचा वापर गरीब राष्ट्रांत सहजतेने करता येणे शक्य आहे.





