भोर : जिल्हा परिषद, पंचायत समिती व भोर नगरपालिकेच्या निवडणुकांच्या तारखा जवळजवळ निश्चित झाल्याने भोर तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ठिकठिकाणी बैठका घेण्याचे काम सुरू झाले आहे. तालुक्यातील भोलावडे – शिंद जिल्हा परिषद गटात भाजपा, राष्ट्रवादी (अजित पवार गट), राष्ट्रवादी (शरद पवार गट) या तीन पक्षातील उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी इच्छुक असून या जिल्हा परिषद गटात तिरंगी लढत होणार आहे. जिल्हा परिषद गटात ७२ गावांचा समावेश असून भोलावडे गणात ३४ गावांचा तर शिंद गणात ३८ गावांचा समावेश आहे. या जिल्हा परिषद गटात डोंगराळ भाग अधिक येत असून नीरा देवघर धरण किनारी वसलेली गावे व भाटघर धरण किनारी वसलेल्या गावांचा समावेश होत आहे. ही गावे विखुरलेली असून निवडणुकीच्या दरम्यान प्रचार करताना उमेदवारांची दमछाक होणार आहे. हे आहेत इच्छूक भोलावडे – शिंद जिल्हा परिषद गटात निवडणुकीच्या रिंगणात उतरण्यासाठी भाजपाचे विठ्ठल आवाळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवीण जगदाळे, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मानसिंग धुमाळ इच्छुक आहेत. भोलावडे – शिंद जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पक्षातील विठ्ठल आवाळे इच्छुक आहेत. त्यांनी कामाच्या माध्यमातून समाजामध्ये ठसा उमटवला आहे. २०१७ ते २०२२ या कालावधीत जिल्हा परिषद सदस्य असताना अनेक विकास कामे त्यांनी केली आहेत. त्यामुळे त्यांचा राजकीय दबदबा आहे. राजकारणात त्यांनी १९९९ साली पदार्पण केले असून माजी आमदार संग्राम थोपटे यांच्याशी ते एकनिष्ठ आहेत. मागील काळात त्यांनी काँग्रेसचे गटनेते म्हणून काम पाहिले होते. तर सोळा वर्षे युवा काँग्रेसचे अध्यक्ष होते. या कालावधीत स्थानिक शेतकऱ्यांना वीज बिल माफी व्हावी, टोल नाका आंदोलन व इतर काही आंदोलने केली आहेत. या जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवीण जगदाळे इच्छुक उमेदवार आहेत. ते २०२२ साली भोलावडे ग्रामपंचायतीत जनतेतून सरपंच पदावर निवडून आले होते. सरपंच पदावर निवडून आल्यानंतर प्राथमिक शाळेत पाण्याचा फिल्टर बसवणे, वर्गखोल्यांमध्ये वाढ करणे, ग्रामपंचायत इमारतीवर सोलर सिस्टिम बसवणे व इतर अनेक विकासकामे केली आहेत. तसेच त्यांनी स्वखर्चाने इयत्ता पहिली ते सातवीच्या ८० विद्यार्थ्यांचा अपघाती विमा काढला आहे. भोलावडे – शिंद जिल्हा परिषद गटात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे मानसिंग धुमाळ इच्छुक आहेत. २००२ ते २००७ या कालावधीत ते भोर पंचायत समितीत उपसभापती पदावर होते. यानंतर त्यांनी २००४ साली भोर विधानसभा निवडणुकीत त्यांना थोड्या फार मतांनी पराभव स्वीकारावा लागला. गेल्या पंचवार्षिकला त्यांच्या पत्नी वंदना धुमाळ जिल्हा परिषद सदस्य होत्या. तसेच त्यांनी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती पदावर काम पाहिले आहे. या कालावधीत त्यांनी अनेक विकास कामे व सामाजिक कामे केली होती. एकाच गावातून दोन उमेदवार ? भोलावडे – शिंद जिल्हा परिषद गटात भाजपाचे विठ्ठल आवाळे, राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रवीण जगदाळे व राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मानसिंग धुमाळ यांच्यात तिरंगी लढत होणार आहे. मानसिंग धुमाळ हे पसुरे गावचे आहेत तर विठ्ठल आवाळे व प्रवीण जगदाळे हे दोघे भोलावडे गावातील आहेत. एकाच गावातील दोन उमेदवार असल्याने भोलावडे गावातील जनता कुणाच्या पाठीशी जाणार ? याकडे सर्वांचे लक्ष लागणार आहे.