पुणे – दिल्लीतील तबलिगी जमातीच्या समारंभातून पुण्यात आलेल्या एकूण ज्या 54 जणांचे नमुने राष्ट्रीय विषाणू संशोधन संस्था (एनआयव्ही) यांच्याकडे पाठवण्यात आले होते, त्यातील दोघांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. रात्री उशिरा हा अहवाल आला असून, या दोघांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीची तत्काळ माहिती घेऊन त्यांची तपासणी करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
दिल्ली येथील निजामुद्दिन याठिकाणी झालेल्या तबलिगी-इ-जमातीच्या मेळाव्याध्ये सहभागी झालेले आणि त्या परिसरात आढळून आलेल्या पुणे विभागातील 182 जणांची यादी प्राप्त झाली. मात्र पुन्हा छाननी केली असता, काही नावे दुबार असल्याचे दिसून आले.
त्यामुळे 182 पैकी 106 जणांची ओळख पटली आहे. त्यामध्ये पुणे, पिंपरी -चिंचवड आणि ग्रामीण मिळून 70 व्यक्तींचा समावेश आहे. त्यातील पुणे शहरात दिवसभरात 54 जणांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये संध्याकाळी पाच वाजेपर्यंत 35 जणांचे नमुने निगेटिव्ह आले होते. अन्य 19 जणांचा अहवाल येणे बाकी होते. रात्री उशिरा यांचा अहवाल आला असता, त्यातील 17 जणांचे नमुने निगेटिव्ह आले, मात्र दोन जणांचे नमुने पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्य आणि प्रशासनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे.
दरम्यान, तपासणी केलेल्या सर्व व्यक्तींना पुढील 14 दिवसांसाठी विलग राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जी व्यक्ती त्याचे पालन करणार नाही, त्याच्यावर कारवाई करण्यात येईल असा इशारा प्रशासनाने दिला आहे. तसे बाधित व्यक्ती मागील 12 दिवसांत कोठे कोठे गेली, कोणाला भेटली, त्यांच्या संपर्कात कोण आले याची माहिती घेऊन, त्यांची करोनाची तपासणी केली जात आहे. हे दोन पॉझिटिव्ह रुग्ण शहरात अनेक ठिकाणी फिरल्यामुळे शहरात बाधितांचा आकडा वाढण्याची भीती वर्तविली जात आहे.
देशभरात 647 जण करोनाबाधित
तबलिगी जमातच्या समारंभानंतर देशातील करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत आढळलेल्या करोनाबाधितांपैकी तब्बल 647 जण त्या समारंभाशी संबंधित आहेत. ते 14 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.तबलिगी समारंभाशी संबंधित करोनाबाधित महाराष्ट्र, अंदमान आणि निकोबार, दिल्ली, आसाम, हिमाचल प्रदेश, हरियाणा, जम्मू आणि काश्मीर, झारखंड, कर्नाटक, राजस्थान, तामिळनाडू, तेलंगण, उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशातील आहेत. तबलिगी सदस्यांमुळे तामीळनाडू आणि दिल्लीतील करोनाबाधितांची संख्या वेगाने वाढली आहे.
तामिळनाडूतील करोनाबाधितांच्या संख्येने 400 चा टप्पा ओलांडला आहे. तर, करोना संसर्ग झालेल्या दिल्लीतील रुग्णांची संख्याही चारशेजवळ जाऊन पोहोचली आहे. दिल्लीतील करोनाबाधितांपैकी 259 जण तबलिगी सदस्य आहेत.