पॉझिटिव्ह न्यूज! करोना लसीमुळे केवळ करोनाच नव्हे तर ‘हे’ आजार देखील होतायेत बरे

लसीकरणानंतर नागरिकांनीच सांगितले अनुभव

लंडन – करोनावर औषध नव्हते, तोपर्यंत चिंतेचे वातावरण होते. आता लस प्राप्त झाल्या आहेत, तर संशयाचे वातावरण आहे. माध्यमांतून उलटसुलट बातम्या आल्याने लसींबाबत शंका आहे. गोंधळाची स्थिती आहे. बहुतेक प्रमुख राष्ट्रांच्या राष्ट्रप्रमुखांनी लस टोचून घेतल्यामुळे आता स्थिती सुधारेल आणि लोक लसीवर विश्‍वास ठेवतील अशी अपेक्षा आहे. त्याचवेळी करोना लसीच्या संदर्भात एक आणखी सकारात्मक बातमीही समोर आली आहे.

ज्या ज्या लोकांनी करोनाची लस घेतली आहे, त्यांना लस घेण्याच्या अगोदर जे इतर त्रास होते ते कमी झाले असल्याचा दावा त्या लोकांनी केला आहे. त्यांना पूर्वीपेक्षा अधिक फिट आणि फ्रेश वाटत असल्याचेही त्यांचे म्हणणे आहे. ज्यांनी लस घेतली आहे त्यांना येत असलेले अनुभव ब्रिटनच्या एका वर्तमानपत्राने प्रकाशित केले आहेत. 

त्यानुसार जे इतर त्रास वर्षानुवर्षे त्या व्यक्तींना तापदायक ठरत होते, ते एकतर कमी तरी झाले आहेत किंवा त्यांचा जाच कमी झाला आहे. एका महिलेने सांगितले की अंग खाजवण्याची समस्या तिला बऱ्याच काळापासून होती. मात्र लसीकरणानंतर त्यात बदल झाला आहे. तर आपल्या पतीला पंधरा वर्षापासून झोपेचा त्रास होता. हा विकार आता गायब झाल्याचे त्या महिलेचे म्हणणे आहे.

ब्रिटनच्या मॅंचेस्टर येथील 72 वर्षीय महिलेचे गेल्या वर्षी गुडघ्याचे ऑपरेशन झाले होते. मात्र इन्फेक्‍शन झाले होते. त्यामुळे त्या महिलेला चालण्यासाठी प्रचंड वेदना सहन कराव्या लागत होते. एकप्रकारे तिचे चालणेच थांबले होते. तथापि, ऍस्ट्राजेनेकाची लस घेउन आल्यानंतर पायाच्या वेदना दुसऱ्या दिवशी पूर्ण नाहिशा झाल्या होत्या. सांधेदुखी पूर्ण गायब झाली असल्याचा दावा तिने केला आहे. पाय जवळ घ्यायलाही कष्ट पडत असलेल्या त्या महिलेने आता चक्क कामावर जाण्याची तयारी सुरू केली आहे.

दरम्यान, एका डॉक्‍टरांनीही वर्तमानपत्रात एक लेख लिहीला आहे. आपल्याला थकव्याचा खूप त्रास जाणवायचा. पण लस घेतल्यानंतर आता फ्रेश वाटत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. तर एका महिलेला 25 वर्षांपासून व्हर्टीगोची समस्या होती. लसीकरणानंतर ती गायबच झाली असल्याचा तिचा दावा आहे.

दरम्यान, एखाद्या लसीनंतर अन्य त्रास कमी होण्याचा अथवा गायब होण्याचा हा काही पहिला अनुभव नसल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे. पोलीओच्या बाबतीतही असाच अनुभव ताजा आहे. पोलीओची लस घेतल्यानंतर फ्लू आणि अन्य संसर्गांना 80 टक्के लगाम बसतो असा दावा खूप पूर्वीच रशियन संशोधकांनी केला होता.

बीसीजी लसीचेही तसेच आहे. त्यामुळे वार्धक्‍यात येणाऱ्या इतर धोकादायक संसर्गाना पायबंद बसतो असे आढळून आले आहे. तर टीबीची लस स्मृतीभ्रंश आणि कर्करोगाच्या समस्येत उपयुक्त ठरली असल्याचेही आढळून आले असल्याचा दावा करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.