Pimpri : बचतगटांना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी पोर्टल

पिंपरी : महिला सक्षमीकरणासाठी महापालिका विविध स्तरांवर प्रयत्नशील आहे. समाज विकास विभागाच्या वतीने बचतगटाच्या महिलांनी तयार केलेल्या वस्तू विक्रीसाठी पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या ‘सक्षमा’ पेजमुळे महिलांना स्वतःच्या हातांनी बनविलेल्या वस्तूंच्या विक्रीसाठी व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. यामुळे महिला रोजगारनिर्मितीच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील असे प्रतिपादन पालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले.
समाज विकास विभाग आणि टाटा स्ट्राईव्ह यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘सक्षमा प्रकल्पा’ अंतर्गत महिला बचत गटांच्या वस्तू विक्रीसाठी तयार करण्यात आलेल्या ‘एसएचजी ई-पोर्टल’वरील ‘सक्षमा’ पेजचे उद्घाटन प्रसंगी आयुक्त सिंह बोलत होते. या वेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उपायुक्त ममता शिंदे, सहाय्यक समाज विकास अधिकारी संतोषी चोरघे, तसेच टाटा स्ट्राइव्हचे प्रतिनिधी अमेय वंजारी, बिचिथा जॉयसे, स्नेहल विचारे, सचिन उपाध्याय, संतोष डोंगरे, अश्विनी सांगेकर आदी उपस्थित होते.
या नव्या डिजिटल उपक्रमाच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तूंना नव्या बाजारपेठा उपलब्ध होतील आणि त्यातून रोजगार व उत्पन्नाच्या संधी मोठ्या प्रमाणावर निर्माण होतील. सक्षमा प्रकल्पाअंतर्गत आतापर्यंत ८ महिला फेडरेशनची स्थापना करण्यात आली आहे. या फेडरेशनद्वारे महिलांना व्यावसायिक संधी आणि सक्षमीकरणासाठी भक्कम आधार देण्यात येत आहे.
या कार्यक्रमात महिला बचत गटांच्या माध्यमातून महिलांनी बनविलेल्या वस्तुंची आयुक्तांनी प्रत्यक्ष पाहणी केली आणि त्यांचे कौतुक केले. या वस्तूंमध्ये स्थानिक, हस्तकलेच्या, उपयुक्त गृहवस्तूंचा समावेश होता. कार्यक्रमात विविध क्षेत्रीय कार्यालयांतील फेडरेशनच्या महिला पदाधिकाऱ्यांचा प्रोत्साहनपर सन्मान करण्यात आला.
पिंपरी चिंचवड शहरातील महिलांमध्ये विविध कौशल्ये आहेत, परंतु त्यासाठी योग्य बाजारपेठ मिळवणे मोठे आव्हान होते. आजच्या डिजिटल युगात सक्षमा ई-पोर्टल हे त्या दृष्टीने एक मोठे पाऊल आहे. समाज विकास विभागाच्या मार्फत शहरातील सर्व महिलांना याचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे.
– ममता शिंदे, उप आयुक्त, समाज विकास विभाग.





