Junior NTR : दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता ज्युनिअर एनटीआर (Junior NTR) आज त्याचा ४३वा वाढदिवस साजरा करत आहे. दमदार अभिनय, भन्नाट डान्स आणि जबरदस्त स्क्रीन प्रेझेन्समुळे त्याने केवळ टॉलीवूडमध्येच नव्हे तर संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, फार कमी लोकांना माहिती आहे की त्याचा अभिनय प्रवास खूप लहान वयातच सुरू झाला होता. ज्युनिअर एनटीआरचा जन्म २० मे १९८३ रोजी झाला. तो तेलुगू चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि माजी मुख्यमंत्री एन. टी. रामाराव यांचा नातू आहे. अवघ्या ८व्या वर्षी त्याने चित्रपटांमध्ये पदार्पण केलं. ‘ब्रह्मऋषि विश्वामित्र’ या चित्रपटातून त्याने बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली. या चित्रपटाचं दिग्दर्शन त्यांचे आजोबा एन. टी. रामाराव यांनी केलं होतं. या चित्रपटात ज्युनिअर एनटीआरने राजा भरतची भूमिका साकारली होती. (Junior NTR) अभिनयासोबतच त्याने शिक्षण आणि कुचिपुडी नृत्याचंही प्रशिक्षण घेतलं. त्याच्या मेहनतीचा आणि अभिनय कौशल्याचा प्रभाव लहान वयातच दिसून आला होता. यानंतर ‘रामायणम्’ या चित्रपटात त्याने प्रभू श्रीराम यांची भूमिका साकारली. त्यावेळी तो अवघा १३-१४ वर्षांचा होता. या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट बालचित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. एवढ्या कमी वयात राष्ट्रीय स्तरावर मिळालेली ही मोठी ओळख त्याच्या करिअरसाठी महत्त्वाची ठरली. Junior NTR: ८व्या वर्षी अभिनयाची सुरुवात, १३व्या वर्षी राष्ट्रीय पुरस्कार; असा घडला ज्युनिअर एनटीआरचा सुपरस्टारपर्यंतचा प्रवास २००१ साली ‘निन्नु चूडालानी’ या चित्रपटातून ज्युनिअर एनटीआरने मुख्य अभिनेता म्हणून पदार्पण केलं. मात्र त्याला खरी लोकप्रियता मिळाली ती ‘स्टुडंट नंबर १’ या चित्रपटातून. विशेष म्हणजे हा दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचाही पहिला चित्रपट होता. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि इथूनच राजामौली आणि ज्युनिअर एनटीआरची हिट जोडी तयार झाली. (Junior NTR) यानंतर ‘सिम्हाद्री’, ‘यमदोंगा’ आणि ‘आरआरआर’सारख्या चित्रपटांनी त्याची लोकप्रियता आणखी वाढवली. विशेषतः ‘आदि’ आणि ‘सिम्हाद्री’ या चित्रपटांमुळे तो तरुणांमध्ये “मास हिरो” म्हणून प्रसिद्ध झाला. त्याची डायलॉग डिलिव्हरी, अॅक्शन स्टाईल आणि अफाट ऊर्जा प्रेक्षकांना खूप आवडली. दिग्दर्शक आणि सहकलाकार अनेकदा त्याच्या तीक्ष्ण स्मरणशक्तीचं कौतुक करतात. मोठमोठे संवाद एका टेकमध्ये बोलण्याची त्याची क्षमता ही त्याची खासियत मानली जाते. वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर २०११ साली त्याने लक्ष्मी प्रणतीसोबत विवाह केला. त्याच्या लग्नाचीही मोठी चर्चा झाली होती. आज ज्युनिअर एनटीआर हा केवळ दक्षिण भारतातच नाही, तर संपूर्ण देशभरात मोठा सुपरस्टार म्हणून ओळखला जातो.