युद्धातील बालकांच्या मृत्यूबद्दल पोपकडून अमेरिकेवर टीका

व्हॅटिकन सिटी – सिरीया, येमेन आणि अफगाणिस्तानमधील युद्धांमध्ये झालेल्या बालकांच्या मृत्यूबद्दल ख्रिश्‍चन धर्मियांचे सर्वोच्च धर्मगुरु पोप फ्रान्सिस यांनी युरोप आणि अमेरिकेला जबाबदार धरले आहे. श्रीमंत पाश्‍चिमात्य देश युद्धप्रवण देशांमधील संघर्षाला चिथावण्यासाठी शस्त्रास्त्रांची विक्री करत आहेत, अशी टीकाही त्यांनी केली आहे. मिलानमधील सॅन कार्लो इन्स्टिट्युटमध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबर संवाद साधताना त्यांनी युरोप आणि अमेरिकेकडून होणाऱ्या शस्त्रविक्रीवर ही टीका केली.

अशा घातक शस्त्रांशिवाय अफगाणिस्तान, येमेन आणि सिरीयासारख्या देशांमध्ये युद्धच होऊ शकले नसते. जे देश शस्त्रांचे उत्पादन आणि विक्री करतात त्यांच्यावर प्रत्येक बालकाचा मृत्यू आणि प्रत्येक कुटुंबाच्या विद्‌ध्वंसाची नैतिक जबाबदारी आहे, असे पोप म्हणाले. प्रत्येक देशाने शरणार्थ्यांना आश्रय द्यायला हवा, असा आग्रह धरताना शरणार्थ्यांच्या छावण्यांमधून गुन्हेगारी वाढेल ही भीती त्यांनी फेटाळून लावली. इटलीमध्येही विदेशी नागरिक आहेत. त्यामुळे गुन्हेगारी केवळ विदेशी नागरिकांमुळेच वाढत नाही. माफियाचा शोध नायजेरियनांनी लावला नाही. माफिया कोणीही असू शकतो. आपणही गुन्हेगार बनण्याची शक्‍यता आहे. युरोप हा शरणार्थ्यांमुळेच बनला आहे, असेही पोप म्हणाले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)