पवन मावळ : निकृष्ट रस्ता, अधिकारी, ठेकेदाराचा सत्कार

पवन मावळ – ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सहा किलोमीटर रस्त्याचे काम काही महिन्यांपूर्वीच पूर्ण झाले. सहा कोटी रुपये खर्च करुन तयार झालेला हा रस्ता अवघ्या काही महिन्यातच खराब झाला. याबाबत दैनिक प्रभातने वृत्त प्रकाशित केल्यानंतर तातडीने अधिकारी या रस्त्याची पाहणी करण्यासाठी आले. परंतु ग्रामस्थांनी या निकृष्ट कामाबद्दल अधिकाऱ्यांना शाल, श्रीफळ देत त्यांचा सत्कार केला आणि गांधीगिरी पद्धतीने या कामाचा निषेध केला.
ठाकुरसाई, गेव्हंडे खडक, जवण अजिवली गावातील प्रमुखांनी रस्ता दुरुस्तेबाबत आक्रमक होत अधिकारी ठेकेदारांचा समाचार घेतला. अधिकारी ठेकेदारांना घेऊन संपूर्ण रस्त्याच्या दूरवस्थेची पाहणी केली. ग्रामसडक योजनेच्या माध्यमातून सहा किलोमीटर रस्त्याचा कामाचा सुरुवात मे महिन्यात झाली होती.
सहा कोटी रुपये मंजूर झालेल्या रस्त्याच्या कामात मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप जवण अजिवली ग्रामपंचायतीचे माजी सरपंच नितिन लायगुडे यांनी केला आहे. आज रस्ता पाहणी करण्यासाठी उप अभियंता प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, रोहित कट्टे, निशिकांत आंबेगावकर, शाखा अभियंता, ठेकेदार आले होते. ग्रामस्थांनी आक्रमक होत दूरवस्थेबाबत पोलखोल केली. संपूर्ण रस्ता पुन्हा नव्याने करुन द्यावा अन्यथा ठेकेदार ब्लॅक लिस्टमध्ये टाका अशी मागणीही यावेळी ग्रामस्थांनी केली.
तातडीने नवीन रस्ता करावा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. यावेळी माजी सरपंच नारायण बोडके, किसन खैरे, भगवान भिकोले, नितीन लायगुडे, संजय मोहोळ, दत्तात्रय ठाकर, भाऊ बोडके, हरिश्चंद्र पासलकर, शंकर भोसले, बंडु खैरे, सदाशिव भोसले, तुकाराम खैरे व ग्रामस्थ उपस्थित होते. सोमवारपासून रस्त्याच्या कामाला सुरुवात होईल, असे यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
‘अधिकारी व ठेकेदार यांचा आज आम्ही सत्कार केलाय. जर रस्ता पूर्णपणे दुरुस्त न केल्यास आंदोलन करणार आहोत. हा रस्ता तयार करुन वर्षपण झाले नाही आणि संपूर्ण रस्त्यावर खड्डे पडले आहे. यामध्ये संबंधित अधिकारी व ठेकेदार यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आहे. यांची चौकशी प्रधान मंत्री कार्यालयातूनच करण्यात यावी. येत्या आठ दिवसांत हा रस्ता जर पूर्णपणे नवीन तयार करून न दिल्यास संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर कारवाई करावी.’- नितीन लायगुडे, माजी सरपंच अजिवली जवण ग्रुप ग्रामपंचायत.


