पुणे | ढिसाळ नियोजन, की तांत्रिक चूक ?

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – मेट्रो प्रशासनाच्या चुकीमुळे स्वारगेट मेट्रो स्थानकातील प्रवाशांंना मंगळवारी मनस्ताप सहन करावा लागला. स्थानकात मेट्रो पोहचल्यानंतर दरवाजे फलाटाच्या बाजूला उघडण्याऐवजी भिंतीकडे उघडले. त्यामुळे प्रवाशांंना योग्य दरवाजा उघडेपर्यंत थांबावे लागले.
काही वेळाने प्रवाशांनी ही चूक मेट्रो प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर फलाटाच्या बाजूला दरवाजे उघडण्यात आले. या प्रकाराबाबत आम आदमी पक्षाचे कार्यकर्ते प्रशांत कांबळे यांनी मेट्रो प्रशासनाकडे तक्रार केली आहे. या प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
कांबळे यांनी दुपारी अडीच वाजता मंडई ते स्वारगेट असा मेट्रो प्रवास केला. काही वेळातच ही गाडी स्वारगेटला पोहचली. तेव्हा दरवाजे उजव्या बाजूला उघडतील, अशी घोषणा झाली. त्यामुळे सर्व प्रवासी उजव्या दरवाजाला उभे राहिले.
मात्र, प्रत्यक्षात उजव्या बाजूला बोगद्याची भिंत होती. तर, डाव्या बाजूला फलाट होते. त्यामुळे प्रवासी चांगलेच गोंधळून गेले. तर, फलाटावर उभे असलेले प्रवासीही दरवाजा उघडण्याची वाट पाहत थांबले. या गोंधळानंतर काही प्रवाशांनी ही चूक मोटरमन तसेच स्थानकावरील मेट्रो कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. तर, कांबळे यांनी थेट स्टेशन कंट्रोलर सुरेश पवार यांची भेट घेत या प्रकरणी संबंधितांवर तत्काळ कारवाईची मागणी केली.





