पुणे – हडपसर रेल्वे स्थानकावर येणारे प्रवासी आणि पीएमपी बसची वाहतूक क्षमता यात बरीच तफावत आहे. त्यामुळे प्रवाशांना अक्षरश: ड्रायव्हरशेजारी बसून प्रवास करावा लागत आहे. पीएमपी प्रशासन डोळ्याला पट्टी बांधून बसचे नियोजन करते काय? असा संतप्त सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे. पुणे विभागाच्या हडपसर स्थानकावर मंगळवार, शुक्रवार आणि रविवार या तीन दिवशी हैदराबाद-हडपसर एक्स्प्रेस (17014) येते. प्रवाशांसाठी सार्वजनिक वाहतुकीची सुविधा नसल्यामुळे काही स्वयंसेवी संस्था आणि रेल्वे प्रशासनाने हडपसर स्थानकावरून पीएमपी सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. पीएमपी प्रशासनाने 22 नोव्हेंबर रोजी हडपसर ते स्वारगेट आणि हडपसर-डेक्कन या दोन मिडी बस सेवा सुरू केली. पण, या बसची क्षमता 22 बसून आणि 10 उभे राहून प्रवास करण्याची आहे. पण, हैदराबाद एक्स्प्रेसने येथे येणाऱ्या प्रवाशांची संख्या 300 ते 400 आहे. जर प्रवाशांची संख्या इतकी जास्त असेत तर येथून केवळ दोन बस सोडून 60 ते 70 प्रवाशांचीच सोय का केली जाते? प्रशासनाला नियोजन करताना रेल्वेने येणाऱ्या प्रवाशांच्या संख्येचा अंदाज नाही का? असे विविध प्रश्न उपस्थित केले जात आहे. पीएमपी बस नसल्यामुळे प्रवाशांना नाईलाजास्तव रिक्षाने जास्तीचे पैसे देऊन प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे प्रशासनाबद्दल नाराजीचे वातावरण आहे. हैदराबाद-हडपसर रेल्वे बोगी संख्या – 16 स्लीपर बोगीची क्षमता – 72 प्रवासी ट्रेन धावण्याचे आठवड्यातील दिवस ः मंगळवार, शुक्रवार, आणि रविवार एकूण सरासरी प्रवासी – 300 ते 400 पीएमपी मिडी बस एकूण बस – 2 एका बसची प्रवाशी क्षमता – 32 पीएमपी प्रशासनाला ग्रामीण भागात वाहतूक सेवेसाठी बस आहेत. पण, शहरातील नागरिकांसाठी बस नाहीत. तसेच यात्रा, जत्रा, क्रिकेट सामने यावेळी बसचे नियोजन केले जाते. पण, आठवड्यातून तीन दिवस हडपसर रेल्वे स्टेशन येथून बस सोडण्यास प्रशासनाकडे बस उपलब्ध नाहीत. – राहुल माने, प्रवासी