Pooja Khedkar : आय ए एस पदावरून बडतर्फ करण्यात आलेल्या डॉ. पूजा खेडकरने त्यांच्या पुण्यातील घरी काल रात्री चोरीचा प्रकार घडल्याची माहिती फोन करून चतुःश्रृंगी पोलिसांना दिली असून, अजब चोरीच्या प्रकारामुळे पुण्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांना दिलेल्या तक्रारीत पूजा खेडकरचे आई आणि वडील यांना बेशुद्ध करुन तर पूजा खेडकरला बांधुन नोकराने चोरी केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तक्रारीची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून तपास सुरू केला आहे. पुण्यातील बाणेर रस्त्यावर खेडकर कुटुंबाचा बंगला आहे. या बंगल्यात चोरी झाल्याचे तक्रारीत सांगण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, खेडकर कुटुंबासह या बंगल्यात अनेक नोकर रहातात. त्यातील एक नोकर आठच दिवसांपूर्वी नेपाळहून आला होता. त्या नोकराने काल रात्री गुंगीचे औषध देऊन दिलीप आणि मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध केले आणि पुजा खेडेकर यांना बांधून ठेवण्यात आले असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. त्यानंतर तो चोर घरातील सर्वांचे मोबाईल घेऊन पसार झाला असल्याचे देखील नमूद करण्यात आले आहे. पूजा खेडकर यांच्या म्हणण्यानुसार, त्यांनी बांधून ठेवलेल्या अवस्थेत दाराच्या कडीचा उपयोग करुन स्वतःचे हात मोकळे केले आणि पोलिसांना फोन केला. त्यानंतर चतुःश्रृंगी पोलिसांचे पथक खेडकर यांच्या घरी पोहचले. यावेळी दिलीप आणि मनोरमा खेडकर हे बेशुद्धावस्थेत पोलिसांना आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पूजा खेडकर यांनी स्वतः दुसऱ्या फोनवरून फोन करून हा प्रकार पोलिसांना कळवला. मात्र, अद्याप लेखी तक्रार पोलिसांकडे दिलेली नाही. आपली मनस्थिती व्यवस्थित झाली की आपण तक्रार देऊ, असे पूजा खेडकर यांनी सांगितले आहे. मोबाईलच्या व्यतिरिक्त घरातील आणखी कोणत्या वस्तू चोरी झाल्या आहेत का याची देखील माहिती पोलिसांना दिलेली नाही.