पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरण : संजय राठोड यांच्या अडचणीत आणखी वाढ ; दबाव वाढल्याने राजीनामा देण्याची शक्यता

मुंबई : राज्याच्या राजकारणात पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्या प्रकरणाने एकच गोंधळ निर्माण झाला आहे. दरम्यान, तिच्या आत्महत्या प्रकरणात शिवसेना नेते आणि महाविकास आघाडी सरकारमधील वनमंत्री संजय राठोड यांचे नाव आल्याने त्यांच्या समोर अडचणी आल्या आहेत. या प्रकरणात आरोप झाल्यापासून संजय राठोड यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत आहे. दरम्यान,राठोड येत्या गुरुवारी राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्येची घटना समोर भाजपाकडून या प्रकरणावर संजय राठोड यांना घेरण्याचा प्रयत्न सुरू झाला. दरम्यान, हे आरोप सुरू झाल्यापासून संजय राठोड हे थेटपणे समोर आलेले नाहीत. मात्र विरोधकांकडून तसेच पक्षामधील एका गटाकडूनही दबाव वाढल्याने आता संजय राठोड हे मंत्रिपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा आहे. संजय राठोड हे गुरुवारी पोहरादेवी येथून राजीनाम्याची घोषणा करणार असल्याची शक्यता आहे.
दरम्यान, संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरून विरोधक आक्रमक झालेले असतानाच शिवसेनेमधील एक गटही त्यांच्या राजीनाम्यासाठी आग्रही आहे. पक्ष किंवा सरकार अडचणीत येत असेल तर राजीनामा घेऊन ठेवावा असाही एक मतप्रवाह पक्षात पाहायला मिळत आहे. संजय राठोड यांच्यावर खूप मोठ्या प्रमाणात दबाव आहे. बंजारा सामाजाची आणि पूजा चव्हाणच्या कुटुंबियांनी संजय राठोड यांना क्लिन चीट दिली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे देखील द्वीधा मनःस्थितीत असल्याचे दिसून येत आहे.
दुसरीकडे शिवसेनेचा एक बडा नेता आणि कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांच्या मागे खंबीरपणे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच धनंजय मुंडे प्रकरणात त्यांच्याकडून राजीनामा घेतला नाही तर मग संजय राठोड यांना तरी राजीनामा द्यायला का लावायचे, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.





