West Bengal : पश्चिम बंगालचे नाव बदलून ‘पश्चिम बंग’ होणार; ‘या’ नेत्याची मोठी घोषणा
पश्चिम बंगालचे (West Bengal) नाव बदलून लवकरच पश्चिम बंग केले जाणार असून, यासाठी विधानसभेच्या आगामी पहिल्याच अधिवेशनात एक विधेयक मांडले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी बुधवारी केली.

West Bengal : पश्चिम बंगालचे (West Bengal) नाव बदलून लवकरच पश्चिम बंग केले जाणार असून, यासाठी विधानसभेच्या आगामी पहिल्याच अधिवेशनात एक विधेयक मांडले जाईल, अशी महत्त्वाची घोषणा पश्चिम बंगाल भाजपचे अध्यक्ष शमिक भट्टाचार्य यांनी बुधवारी केली.
वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना ते म्हणाले, आपल्या राज्याचे नाव (West Bengal) आता फक्त ‘पश्चिम बंग’ हेच असेल. या आठवड्याच्या सुरुवातीलाच त्यांनी या प्रक्रियेबद्दल संकेत दिले होते. भाजप प्रदेश अध्यक्षांच्या म्हणण्यानुसार, या प्रस्तावित कायदेशीर पावलाचा उद्देश राज्याचे अधिकृत नाव त्याच्या ऐतिहासिक ओळखीशी जोडणे हा आहे.
लवकरच पहिल्याच अधिवेशनात आमचे सरकार एक विधेयक सादर करणार आहे, जेणेकरून राज्याचे नाव त्याच्या इतिहासाशी घट्ट जोडलेले राहील आणि हीच त्याची खरी ओळख बनेल. म्हणूनच राज्याचे नाव पश्चिम बंग ठेवण्यात येत आहे.
दरम्यान, १९९९ मध्ये डाव्यांच्या सरकारने सर्वप्रथम राज्याचे नाव पश्चिम बंग ठेवण्याचा प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर तत्कालीन काँग्रेस आमदार सौगत रॉय यांच्या सूचनेवरून बांग्ला नावाचा प्रस्ताव पुढे आला, मात्र केंद्राने तो फेटाळला. २०११ मध्ये तृणमूल काँग्रेस सत्तेत आल्यानंतर पुन्हा पश्चिम बंग नावाचा प्रस्ताव ठेवण्यात आला, ज्याला यूपीए-२ सरकारने मंजुरी दिली नाही.
२०१६ मध्ये तीन भाषांसाठी वेगवेगळे प्रस्ताव देण्यात आले. अखेर जुलै २०१८ मध्ये पश्चिम बंगाल विधानसभेने सर्वसहमती राज्याचे नाव बदलून बांग्ला करण्याचा प्रस्ताव मंजूर करून केंद्र सरकारकडे मंजुरीसाठी पाठवला होता.
केंद्राने या प्रस्तावासाठी घटनात्मक दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे सांगितले होते. तसेच, बांग्ला हे नाव शेजारील बांग्लादेशशी मिळतेजुळते असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर संभ्रम निर्माण होऊ शकतो, असे सूत्रांचे म्हणणे होते. दरम्यान, २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी राज्यसभेत सांगितले होते की, केंद्राने या नाम बदलाला (West Bengal) मंजुरी दिलेली नाही.






