Narendra Modi : तृणमूल काँग्रेसचे क्रूर सरकार महिलांवर अत्याचार करणाऱ्या गुंडांना आश्रय देत आहे. आता हे अत्याचार सहन केले जाणार नाहीत. तुम्ही मला मतदान द्या, मी तुम्हाला टीएमसीच्या महाजंगलराजपासून मुक्ती देईन,” अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी रविवारी पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारवर कडाडून हल्ला चढवला. उत्तर २४ परगणा जिल्ह्यातील ठाकूरनगर येथे मतुआ समुदायाच्या बालेकिल्ल्यात आयोजित सभेत पंतप्रधान (Narendra Modi) बोलत होते. भाजपने संदेशखळी येथील आंदोलक रेखा पात्रा आणि आर.जी. कर प्रकरणातील पीडितेच्या मातेस उमेदवारी देऊन महिलांच्या सुरक्षेप्रती आपली कटिबद्धता सिद्ध केली आहे, असे मोदींनी यावेळी नमूद केले. संदेशखळीतील घटनांचा उल्लेख करत त्यांनी टीएमसीवर महिलांवरील अत्याचारांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. धार्मिक छळामुळे शेजारील देशातून भारतात आश्रयाला आलेल्या सर्व निर्वासितांना नागरिकत्व सुधारणा कायद्यांतर्गत (सीएए) सन्मानाने नागरिकत्व दिले जाईल, असे आश्वासन पंतप्रधानांनी दिले. Narendra Modi याचवेळी त्यांनी घुसखोरांना कडक इशारा देताना म्हटले की, २९ एप्रिल रोजी मतदानाचा शेवटचा टप्पा संपण्यापूर्वी त्यांनी देश सोडावा, अन्यथा ४ मे रोजी निकाल लागल्यानंतर त्यांना बाहेर काढले जाईल. विजयाचा विश्वास पहिल्या टप्प्यात झालेल्या ९३ टक्के विक्रमी मतदानाचा संदर्भ देत मोदी (Narendra Modi) म्हणाले की, मतदारांनी पहिल्याच फेरीत टीएमसीचा अहंकार मोडीत काढला असून दुसऱ्या टप्प्यात भाजपचा विजय निश्चित होईल. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या ‘तुम्ही मला रक्त द्या, मी तुम्हाला स्वातंत्र्य देईन’ या घोषणेची आठवण करून देत, त्यांनी बंगालच्या जनतेला भाजपच्या बाजूने कौल देण्याचे आवाहन केले. टीएमसीचे ‘निर्मम’ सरकार आता उलथवून लावण्याची वेळ आली असल्याचेही त्यांनी ठामपणे सांगितले.