Laljit Singh Bhullar : अमृतसर येथील वखार महामंडळाचे व्यवस्थापक गगनदीप सिंह रंधावा यांच्या आत्महत्येप्रकरणी पंजाबचे परिवहन आणि कारागृह मंत्री लालजीत सिंह भुल्लर (Laljit Singh Bhullar) यांनी शनिवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी या उद्देशाने भुल्लर यांना पद सोडण्याचे आदेश दिले होते. मृत्यूपूर्वी रंधावा यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसारित केला होता, ज्यामध्ये त्यांनी मंत्री भुल्लर यांच्यावर छळाचे गंभीर आरोप केले होते. निविदा प्रक्रियेत हस्तक्षेप, मारहाण आणि लाच घेतल्याची खोटी कबुली देण्यासाठी दबाव टाकल्याचे आरोप शिरोमणी अकाली दलाचे नेते विक्रम सिंह मजिठिया यांनी केले आहेत. काँग्रेसनेही या प्रकरणाची उच्च न्यायालयामार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे. Laljit Singh Bhullar मुख्यमंत्री मान यांनी या प्रकरणाच्या चौकशीसाठी मुख्य सचिवांची नियुक्ती केली असून, तपासावर कोणताही राजकीय दबाव येऊ नये म्हणून मंत्र्यांचा राजीनामा घेतल्याचे स्पष्ट केले. दरम्यान, आमदार भुल्लर यांनी सर्व आरोप फेटाळले असून सत्याच्या शोधासाठी आपण स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे फेसबुक पोस्टद्वारे म्हटले आहे.