G. Parameshwara : कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलण्याबाबत गेल्या काही दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरू असलेल्या चर्चांना गृहमंत्री जी. परमेश्वर यांनी आज पूर्णविराम दिला आहे. जोपर्यंत काँग्रेस हायकमांड कोणताही वेगळा निर्णय घेत नाही, तोपर्यंत सिद्धरामय्या हेच राज्याचे मुख्यमंत्री पदावर कायम राहतील, असे त्यांनी शनिवारी येथे स्पष्ट केले. सध्या तरी हायकमांडच्या स्तरावर नेतृत्वामध्ये बदल करण्याबाबत कोणतीही हालचाल किंवा निर्णय झालेला नाही, असेही त्यांनी ठामपणे सांगितले.परमेश्वर यांना त्यांच्या स्वतःच्या मुख्यमंत्री पदाच्या मागणीबाबत विचारले असता, त्यांनी हा निर्णय पूर्णपणे पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाच्या हातात असल्याचे सांगून या विषयाला बगल दिली. हायकमांड राज्यातील सर्व घडामोडींवर बारीक लक्ष ठेवून आहे आणि जेव्हा त्यांना योग्य वाटेल तेव्हाच ते यावर भाष्य करतील. सध्या अशी कोणतीही परिस्थिती उद्भवली नसल्याचे हायकमांडला वाटत असावे, म्हणूनच या विषयावर अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका मांडण्यात आलेली नाही, असेही ते म्हणाले. सिद्धरामय्या आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणार का, या प्रश्नाला उत्तर देताना परमेश्वर म्हणाले की, सिद्धरामय्या यांची निवड हायकमांडने केली असून, त्यांचा आदेश असेपर्यंत ते या पदावर राहतील. २०२३ च्या विधानसभा निवडणुकीनंतर मुख्यमंत्री निवडीसाठी झालेल्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत सिद्धरामय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले होते. त्यावेळी अडीच-अडीच वर्षांच्या रोटेशनल मुख्यमंत्री पदाचा कोणताही प्रस्ताव किंवा करार झाल्याची माहिती मला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, नोव्हेंबर २०२५ मध्ये सरकारचा अडीच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यापासून मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यात सत्तेच्या संघर्षाच्या बातम्या पुन्हा एकदा जोर धरू लागल्या आहेत. सिद्धरामय्या यांचे पुत्र यतिंद्र यांनी अलीकडेच त्यांचे वडील पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, असे विधान केल्याने या वादाला तोंड फुटले होते.