Bhosari bridge : भोसरीतील पूलावरून राजकारण शिगेला? पूल पाडणार असल्याचा मेट्रोचा दावा
Bhosari bridge : महापालिकेतील पदाधिकाऱ्यांचे तोंडावर बोट

पिंपरी – निगडी ते चाकण मेट्रोचा नवीन सुधारित सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) महामेट्रोकडून गुरूवारी (दि. २०) महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करण्यात आला.
हे सादरीकरण करत असताना महामेट्रोच्या अधिकाऱ्यांनी भोसरी येथील उड्डाणपूल पाडणार असल्याचे सांगितले. मात्र, महापालिकेतील पदाधिकाऱ्यांनी याबाबत बोलणे टाळले. त्यामुळे मेट्रोच्या कामासाठी पाडण्यात येणाऱ्या या पुलाबाबत आता नव्याने राजकारण रंगले असल्याचे बघायला मिळत आहे.
महामेट्रोकडून सुरुवातीला निगडी ते चाकण मेट्रो वल्लभनगर, टेल्कोरोड, स्पाइन रस्ता मार्गे पुढे मोशी असा मार्ग नमूद केला होता. मेट्रो भोसरीमार्गे नेण्याची मागणी जोर धरू लागल्याने महामेट्रोने डीपीआरमध्ये सुधारणा केली. सुधारित आराखड्यानुसार निगडी ते चाकण हा मेट्रो मार्ग एकूण ४५.२ किलोमीटर लांबीचा असणार आहे.
या मार्गावर पूर्वी ३१ मेट्रो स्थानके प्रस्तावित होती. परंतु, बदलानंतर तीन स्थानकांची वाढ झाली असून, ३४ स्थानके प्रस्तावित आहेत. या प्रकल्पाचा अंदाजित खर्च सुमारे १२ हजार ३७ कोटी रुपये आहे. हा मेट्रो मार्ग निगडीतील भक्ती-शक्ती चौक, ट्रान्सपोर्टनगर, रावेत, पुनावळे, ताथवडे, भुमकर चौक, वाकड, भुजबळ चौक, विशालनगर कॉर्नर, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, नाशिक फाटा, संत तुकारामनगर, वायसीएम, टेल्को रस्ता, लांडेवाडी, भोसरीगाव, पांजरपोळ, मोशी ते चाकण असा असणार आहे.
भोसरीमार्गे मेट्रोमुळे सद्यस्थितीत पुणे-नाशिक महामार्गावरील भोसरीतील उड्डाणपूल पाडण्यावरून आणि मेट्रोच्या मार्गावरुन मतमतांतरे होती. यासाठी गेल्या महिन्यात मेट्रोच्या पुणे कार्यालयात झालेल्या बैठकीत देखील दोन गटांमध्ये चांगलीच जुंपली होती. त्यावर हा विषय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहचविण्यात आला होता.
त्यानंतर देखील महापालिकेतील पदाधिकारी भोसरीतील उड्डाणपूलावर बोलायला तयार नव्हते. अखेर गुरूवारी मेट्रोच्या अधिकाऱ्यांनीच सभेत पूल पाडणार असल्याचे जाहीर केले. तसा निर्णय देखील झाला असल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतर देखील पदाधिकारी यावर बोलायला तयार नसल्याने नेमक यात काय राजकारण शिजतयं असा सवाल उपस्थित केला जात आहे.
डीपीआरला मान्यता नाहीच
मेट्रो प्रकल्प जलदगतीने राबवावा, शहरात आणखी मेट्रोचे जाळे वाढवावे अशा सूचना लोकप्रतिनिधी व पदाधिकारी करत आहेत. ऑगस्ट महिन्यातील महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत या डीपीआरला मान्यता देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार होता. मात्र, सादरीकरण व्यवस्थित होत नसल्याने विरोधकांसह सत्ताधारी नगरसेवकांनी देखील आक्षेप घेतला. त्यानंतर सभा देखील तहकूब करण्यात आली. तर आता पुढील आठवड्यात पुन्हा या प्रकल्पाचे सादरीकरण होणार आहे.
‘नाशिक फाटा येथून एलिव्हेटेड रस्ता असणार आहे. म्हणजेच दुसऱ्या मजल्यावरून वाहनांसाठी वाहतूक तर त्यावर मेट्रो धावणार आहे. त्यासाठी भोसरी येथील उड्डाणपूल पाडण्याचा निर्णय झाला आहे. हा मेट्रो मार्ग झाल्यानंतर शहर आणि चाकण जोडले जात वाहतूककोंडी कमी होणार आहे.’- अतुल गाडगीळ, संचालक महामेट्रो
Pune District : भाजप राजवटीत राम मंदिरातील संपत्ती लुटली; खासदार संजय राऊत





