पुणे | दुर्दैवी घटनेचे महाविकास आघाडीकडून राजकारण

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – बदलापूर येथे घटना घडल्यानंतर महायुती सरकारने तत्काळ पावले उचलली. मात्र, महाविकास आघाडीचे नेते या दुर्दैवी घटनेचे राजकारण करून राज्यात अशांतता माजविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप आमदार माधुरी मिसाळ यांनी केला.
भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेमध्ये त्या बोलत होत्या. यावेळी भाजपचे शहर अध्यक्ष धीरज घाटे, हर्षदा फरांदे, पुष्कर तुळजापूरकर उपस्थित होते.
मिसाळ म्हणाल्या, “या प्रकरणी तत्काळ एसआयटी नेमली, अकार्यक्षम पोलिसांना बडतर्फ केले,
सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नेमणूक केली, सर्वपक्षीय मंडळी विश्वस्त मंडळावर असलेल्या संबंधित शैक्षणिक संस्थेची चौकशी सुरू केली, नराधमाला अटक केली. महायुती सरकारने शक्य ते सर्व तातडीने केले. याप्रकरणात एफआयआर नोंदवण्याबाबत पोलिसांकडून दिरंगाई घडल्याची टीका केली जाते आहे.
मात्र लहान मुलगी पोलीस ठाण्यात आल्यानंतर लगेच वैद्यकीय तपासणीला पाठवले, तपासणीला किमान 3-4 तास लागतात. त्यानंतर तिच्याकडून पोलीस ठाण्यात जबाब नोंदवून घेतला. सरकारने आवश्यक ती सगळी पावले उचलली आहेत. असे असताना विरोधकांकडून राजकीय पोळ्या भाजण्याचे काम केले जात आहे.





