पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार हे राजकीय मैदानात उतरणार असल्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या चर्चांना अधिकच वेग आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जय पवार हे बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची शक्यता आहे. बारामती नगरपरिषदेचं नगराध्यक्षपद यंदा सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव झाल्यामुळे, जय पवार यांच्या नावाभोवती चर्चा अधिक केंद्रित झाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राजकीय पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली असून, या संभाव्य उमेदवारीमुळे बारामतीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया – जय पवार यांच्या उमेदवारीच्या चर्चेवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला. यावर त्यांनी अत्यंत मोजक्या शब्दांत प्रतिक्रिया दिली. खासदार सुळे म्हणाल्या, “उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची? हा त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न आहे. आपण एका सशक्त लोकशाहीमध्ये राहतो आणि कोणत्याही पक्षाने कोणाला उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे.” सुप्रिया सुळे यांनी हा ‘त्यांच्या पक्षातील अंतर्गत प्रश्न’ असल्याचे सांगून, या विषयावर अधिक भाष्य करणे टाळले. अजित पवार गटाच्या भूमिकेकडे लक्ष – दरम्यान, जय पवार यांच्या राजकीय प्रवेशाची चर्चा सध्या जोरावर असली तरी, यावर अद्याप अजित पवार, जय पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या वतीने अधिकृत प्रतिक्रिया समोर आलेली नाही. जय पवार यांच्या उमेदवारीबाबत अजित पवार गट काय भूमिका घेतो, आणि अधिकृत घोषणा कधी होते, याकडे केवळ बारामतीकरांचेच नव्हे, तर संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले आहे. ही चर्चा केवळ राजकीय गप्पांपर्यंत मर्यादित राहते की, जय पवार खरोखरच निवडणुकीच्या रिंगणात उतरतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.