राजगुरुनगर : भीमाशंकर विकास आराखड्यावरून पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले असून, माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या टीकेला माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शुक्रवारी राजगुरुनगर येथे प्रत्युत्तर दिले. दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत भीमाशंकर देवस्थान विकास आराखड्याबाबत ऑनलाईन बैठक पार पडली होती. या बैठकीत माजी मंत्री दिलीप वळसे पाटील तसेच खेडचे आमदार बाबाजी काळे सहभागी झाले होते. बैठकीदरम्यान विकास आराखड्याचा उल्लेख “खेड-आंबेगाव” असा करण्यात आल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले. या मुद्द्यावरून माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी आमदार बाबाजी काळे यांनी त्या उल्लेखाला सहमती दर्शवल्याचा आरोप करत टीका केली होती. तसेच दिलीप वळसे पाटील यांच्यावरही निशाणा साधला होता. दरम्यान, आमदार बाबाजी काळे यांचे बंधू ॲड. विलास रामचंद्र काळे यांच्या निधनानंतर शुक्रवारी पाडळी येथे काळे यांच्या निवासस्थानी दिलीप वळसे पाटील यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी नाव न घेता माजी आमदार मोहिते पाटील यांच्यावर खरमरीत टीका केली. यावेळी ज्येष्ठ नेते नानासाहेब टाकळकर, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण सातकर, कात्रज दूध संघाचे माजी अध्यक्ष विष्णु हिंगे, बाजार समिती संचालक हनुमंत कड, दत्ता सातपुते आदी उपस्थित होते. दिलीप वळसे पाटील म्हणाले, “बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले भीमाशंकर हे मंदिर खेड तालुक्यात आहे. मात्र मंदिरालगतचा मार्ग आणि पायऱ्यांचा काही भाग आंबेगाव तालुक्यात येतो. त्यामुळे विकास आराखड्यात खेड-आंबेगाव असा उल्लेख होतो. इको सेन्सिटिव्ह क्षेत्र आणि वनविभागाच्या अटींमुळे खेड तालुक्यात अनेक कामे रखडतात. तरीही आम्ही विकासकामांमध्ये कधीही राजकारण केले नाही.” माजी आमदार मोहिते पाटील यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना ते म्हणाले, “क्षमता असलेल्या लोकांनी रडगाणे गाणे योग्य नाही. मी आठ वेळा आमदार झालो असून विकासकामांत कधी राजकारण केले नाही. चासकमान धरण परिसरातील कळमोडी प्रकल्पासाठी आमदार बाबाजी काळे आणि आम्ही एकत्र काम करत आहोत.” “माजी मंत्री, आमदार असलो तरी खेड तालुक्यातील राजकीय किंवा सामाजिक क्षेत्रात कधीही अधिकार गाजवले नाहीत. भीमाशंकर देवस्थानच्या विकासावरून वाद होत असतील तर मंदिर आणि विकास आराखड्याला खेडचेच नाव राहू द्या.” —दिलीप वळसे पाटील, माजी मंत्री हेही वाचा : Pune District : शेट्टी-खोत भेटीने चर्चांना उधान