Nanded Municipal Corporation : राज्यात महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरु झाली आहे. मुंबईसह राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत, यासाठी १५ जानेवारी मतदान तर १६ जानेवारीला मतमोजणी करून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. ही निवडणूक महाविकास आघाडी आणि महायुती दोघांसाठी महत्वाची असणार आहे. नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत महायुतीला मिळालेले यश पाहता महापालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचा मोठा कस लागणार हे निश्चित आहे. या पार्श्वभूमीवर नेत्यांवर मोठी जबाबदारी निवडणुकीच्या अनुषंगाने सोपविण्यात आली आहे. नांदेड महापालिकेची निवडणूक देखील होणार असून, पदाधिकारी कामाला लागले आहेत. मात्र, महायुतीमधील दोन मोठ्या नेत्यांमध्ये एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. नुकतेच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी भाजपचे नेते अशोक चव्हाण यांच्यावर बोचरी टीका केली होती. मुस्लिम नगरसेवक हे एमआयएममध्ये जात आहेत. हि भाजपचीच बी टीम आहे. अशोक चव्हाण यांना भाजप हिरवी करायची आहे, अशी बोचरी टीका चिखलीकर यांनी केली होती. आता या टीकेला अशोक चव्हाण यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ऑल इंडिया मजलीस ए इत्तेहादूल मुस्लिमीन म्हणजेच एमआयएम आणि आमचा काही संबंध नसल्याचे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. तसेच चव्हांणांनी चिखलीकर यांनी केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. अशोक चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना आव्हान दिले आहे. तुमच्यात ताकद असेल तर तिकडे जा आणि होत असलेलं सगळे थांबवा, असे अशोक चव्हाण म्हणाले आहेत. निवडणुकीत कोणाला कुठंही जाता येते. त्या उलट त्यांचाकडे उमेदवार नाही याचे दुर्दैव वाटत असल्याचा खोचक टोलाही अशोक चव्हाण यांनी प्रताप पाटील चिखलीकर यांना लगावला आहे. २१ डिसेंबरला राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचा निकाल जाहीर करण्यात आला. लोहा नगरपालिकेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांकडून 50 किलोच्या खारीक खोबऱ्याच्या हाराने स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या पक्षाचे नेते आमदर प्रताप पाटील चिखलीकर यांनी टीका केली होती. गेल्या काही दिवसांपासून नांदेड जिल्ह्यातील राजकारण तापले असून अशोक चव्हाण आणि प्रताप पाटील चिखलीकर यांच्यात शाब्दिक युद्ध पाहायला मिळत आहे. हे दोन्ही नेते एकमेकांवर टीका करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे नांदेड महापालिकेच्या निवडणुकीत जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली असून, भाजप आणि राष्ट्रवादीने मोठी तयारी केली आहे. राष्ट्रवादीच्या विजयात चिखलीकरांचा मोलाचा वाटा नांदेड महापालिकेसाठी भाजप आणि शिवसेना शिंदे यांच्यात युतीच्या चर्चा सुरू आहेत. राष्ट्रवादीकडून भाजपला युतीचा प्रस्ताव दिला आहे, पण याबाबत नकाराची घंटा देण्यात आली असल्याची माहिती आहे. नुकत्याच झालेल्या जिल्ह्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांत महायुतीला चांगले यश मिळाले, यामध्ये प्रताप पाटील चिखलीकरांचा लोहा-कंधार भागात राष्ट्रवादीला विजय मिळवून देण्यात मोठा वाटा आहे. अशोक चव्हाणांनी केली होती टीका दरम्यान, काही दिवसांपूर्वीच खासदार अशोक चव्हाण यांनी देखील चिखलीकरांवर तोंडसुख घेतले होते. काही लोकांना तर माझं नाव घेतल्याशिवाय जेवणच जात नाही हा त्यांचा प्रॉब्लेम आहे, अशा शब्दांत खासदार अशोक चव्हाण यांनी महायुतीतील मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांना टोला लगावला होता. त्यामुळे आगामी काळातही दोन्ही नेत्यांमध्ये शाब्दिक चकमक आणखी वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. हेही वाचा : प्रतिक्षा संपली! महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीतच ZP निवडणुकांची घोषणा; मोठी अपडेट समोर