खालापूर – राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनिल तटकरे यांनी अखेर मौन सोडत आमदार महेंद्र थोरवे यांच्यावर थेट आणि जोरदार टीका केली आहे. माझ्या ४० वर्षांच्या सार्वजनिक जीवनात माझ्यावर एकही गुन्हा नाही. माझा डीएनए तपासा म्हणणाऱ्यांच्या नावावर किती गुन्हे आहेत, ते आधी तपासावेत, अशा शब्दांत तटकरेंनी थोरवे यांच्यावर निशाणा साधला. नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी अजित पवारांची राष्ट्रवादी, शेकापक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे. नगराध्यक्षपदाचे डॉ.सुनिल पाटील आणि सर्व नगरसेवकपदाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा.सुनिल तटकरे, ज्येष्ठ नेते बंधु पाटील, दत्ताजीराव मसुरकर, भरत भगत, अशोक भोपतराव, शेकापचे विधानसभा अध्यक्ष संतोष जंगम, महिला जिल्हाध्यक्षा शिवानी जंगम, तालुका चिटणीस किशोर पाटील, पंकज पाटील, एकनाथ धुळे, शिवसेनेचे शहर प्रमुख अंकुश पवाली, नगराध्यक्षपदाचे उमेदवार डॉ. सुनिल पाटील यांच्यासह परिवर्तन विकास आघाडीचे पदाधिकारी आणि नगरसेवकपदाचे उमेदवार उपस्थित होते. खोपोलीत चार वर्षांपासून प्रशासक राज आहे. त्यांची अवस्था म्हणजे उठ म्हटलं की उठला पाहिजे, अशी झाली आहे. प्रारूप विकास आराखडा तयार झाला, पण या प्रारूप विकास आराखड्यात काय दडलयं, हे जनतेला सांगण्यासाठी परिवर्तन विकास आघाडी स्थापन केली आहे. या आघाडीच्या माध्यमातून खोपोली शहराच्या विकासासाठी उपमुख्यमंत्री अजित पवारांची साथ असल्याचा विश्वास तटकरेंनी यावेळी व्यक्त केला आहे. २०१९ ला काय ग्रहण लागलं होतं? तटकरे पुढे म्हणाले, २०१९ मध्ये सुरेश लाड यांनी नकारात्मक भूमिका घेतली, त्यामुळे मतदारसंघात अपप्रवृत्ती आली. मी युतीचा धर्म पाळला नसता तर आज आमदार सुधाकर घारे असते. पुढे तटकरेंनी आणखी एक गंभीर आरोप करताना सांगितले की, अदिती तटकरे पालकमंत्री झाल्या तेव्हा काहींनी चूकीच्या पद्धतीने महिलांविषयी बोलण्याचा प्रयत्न केला. तेव्हा संघर्ष तयार झाला, मात्र आम्ही संयम पाळला.