पालघर जिल्ह्यातील वाडा नगरपंचायत निवडणुकीचे निकाल रविवारी जाहीर झाल्यानंतर भाजपचे नगरसेवक तेजेश पाटील यांच्या विजयाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीदरम्यान सीएनजी गाडीसमोर फटाके फोडण्यास विरोध करणाऱ्या दोन महिलांना भाजप कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याची गंभीर घटना घडली. ही घटना वाडा शहरात दुपारी घडली असून, यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. निवडणुकीत भाजपला वाडा नगरपंचायतीत यश मिळाले असून, एका प्रभागातून तेजेश पाटील हे भाजपचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. विजयानंतर कार्यकर्त्यांनी उत्साहात मिरवणूक काढली होती. मात्र, मिरवणूक जखमी महिलांच्या घरासमोरून जात असताना कार्यकर्त्यांनी त्यांच्या सीएनजी कारसमोर फटाक्यांची माळ फोडली. याला महिलांनी विरोध केला असता, कार्यकर्त्यांनी त्यांना शिवीगाळ केली आणि मारहाण केल्याचा आरोप आहे. जखमी महिलांनी सांगितले की, “भाजपचे विजयी नगरसेवक तेजेश पाटील यांची मिरवणूक आमच्या घरासमोर आली तेव्हा आमच्या कारवर फटाक्यांची माळ फोडली जात होती. सीएनजी गाडीसमोर फटाके फोडू नका, असे आम्ही सांगितले. मात्र, त्यांनी आम्हाला शिवीगाळ करून मारहाण केली.” या मारहाणीत दोन्ही महिलांना किरकोळ दुखापत झाली असून, त्यांच्यावर वाडा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची तक्रार महिलांच्या नातेवाईकांनी वाडा पोलीस स्टेशनमध्ये दाखल केली आहे. जखमी महिलांनी सरकारकडे आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी केली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही घटना स्थानिक पातळीवर चर्चेचा विषय ठरली असून, विजयाच्या उत्साहात अशा प्रकारच्या हिंसक कृत्याला नागरिकांनी निषेध व्यक्त केला आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणात त्वरित कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे.