Rahul Gandhi : “राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध यांची वाटचाल अंधकाराकडे” – राहुल गांधी
दुसऱ्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही; केवळ बॉम्बफेक करणे आणि जीव घेणे एवढेच सध्या सुरू आहे.

Rahul Gandhi – सध्याचे राजकारण आणि आंतरराष्ट्रीय संबंध ज्ञानाचा प्रकाश सोडून अंधाराकडे वेगाने धावत असल्याचे प्रतिपादन लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी केले. आजच्या काळात कोणालाही दुसऱ्याचे म्हणणे समजून घेण्यात रस नसून, केवळ मतभेदापोटी हिंसेचा मार्ग अवलंबला जात असल्याबद्दल त्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली.
महात्मा गांधी आणि थोर समाजसुधारक श्री नारायण गुरू यांच्या ऐतिहासिक भेटीला १०० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त आयोजित एका विशेष कार्यक्रमात राहुल गांधी बोलत होते. यावेळी त्यांनी सद्यस्थितीतील राजकीय संघर्षावर भाष्य करताना सांगितले की, देशांतर्गत राजकारण असो किंवा जागतिक संबंध, सर्वत्र संवाद हरवत चालला आहे.
आपण एखाद्या व्यक्तीशी किंवा विचाराशी असहमत असतो, तेव्हा त्याला समजून घेण्याऐवजी त्याच्यावर थेट हल्ला केला जातो किंवा हिंसक मार्गाने त्याला दाबण्याचा प्रयत्न केला जातो, असे गांधी म्हणाले.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धांच्या परिस्थितीवर भाष्य करताना ते म्हणाले की, दुसऱ्याची बाजू समजून घेण्याचा प्रयत्न कोणीही करत नाही; केवळ बॉम्बफेक करणे आणि जीव घेणे एवढेच सध्या सुरू आहे. ही प्रवृत्ती लोकशाही आणि मानवी मूल्यांसाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.
याप्रसंगी राहुल गांधी यांनी महात्मा गांधी आणि श्री नारायण गुरू यांच्या विचारांची आठवण करून दिली. हे दोन्ही महान नेते हिंसेच्या विरोधात होते आणि त्यांनी नेहमीच प्रेम, आदर, क्षमाशीलता आणि परस्पर सामंजस्याचा पुरस्कार केला होता. आजही समाज आणि राजकारण योग्य दिशेला नेण्यासाठी याच मूल्यांची नितांत गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.






