Ram Shinde : राज्यात कुख्यात गुंड निलेश घायवळ प्रकरण चर्चेत आहे. या प्रकरणावरून आरोप प्रत्योरांच्या फैरी झडू लागल्या आहेत. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत महायुती सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. नुकतेच रोहित यांनी विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांच्यावर खळबळजनक आरोप केला होता. राम शिंदे यांनीच निलेश घायवळ याला परदेशात पळून जाण्यास मदत केली, असा गंभीर आरोप रोहित पवार यांनी केला होता. या आरोपांवर आता राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली असून स्फोटक दावा केला आहे. निलेश घायवळ प्रकरणात रोहित पवार हे धादांत खोटे बोलत आहेत. मात्र, ते आता तोंडघशी पडले आहेत. निलेश घायवळ यांना अनिल देशमुख यांच्या माध्यमातून रोहित पवार यांनीच पासपोर्ट मिळवून दिला होता, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. तर रोहित पवार हे बिनसलेले व्यक्तिमत्व असून ते दररोज खोटं बोलण्याचे काम करतात, असे म्हणत त्यांच्यावर टीकास्त्र डागले. माझा आणि निलेश घायवळचा दूरपर्यंत एकमेकांशी संबंध नाही, असे राम शिंदे यांनी स्पष्ट केले. राम शिंदेंचा गंभीर आरोप निलेश घायवळ याचे महायुतीमधील अनेक बड्या नेत्यांसोबत फोटो आणि व्हिडीओ सामोर आले होते. यावरून घायवळ याला कोण अभय देत असल्याची चर्चा सुरू आहे. या प्रकरणावर महायुतीमधील शिवसेनेचे नेते रवींद्र धंगेकर यांनी गंभीर आरोप केले आहेत. घायवळ प्रकरणावरून रोहित पवार आणि राम शिंदे यांच्यात राजकीय वॅार सुरू असल्याचे चित्र आहे. रोहित पवारांनीच घायवळला 2019 मध्ये मला पाडण्यासाठीच घायवळला निवडणुकीच्या प्रचारात आणले, असा गंभीर आरोप राम शिंदे यांनी केला आहे. घायवळसोबत कौटुंबिक संबंध? रोहित पवार यांचे वडील निलेश घायवळच्या घरी गेले होते, त्यांना बोलावलं. या सगळ्यांच्या मगरपट्ट्यात बैठका झाला. मात्र, नंतर त्यांचं व्यवहार की जमीन व्यवहार कशावरुन बिनसले, ते मला माहिती नाही असा मोठा दावा राम शिंदे यांनी केला आहे. रोहित पवार यांचे निलेश घायवळ यांच्याशी कौटुंबिक संबंध होते, असेही ते म्हणाले आहेत. त्यामुळे आता निलेश घायवळ प्रकरणावरून राजकारण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत. राम शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर रोहित पवार काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. हेही वाचा : शेअर बाजार सकारात्मक पातळीवर उघडला ; सेन्सेक्स २०० अंकांनी तर निफ्टी २५,२९० च्या वर गेला