सोशल मीडियावर राजकीय ‘वॉर’ 

– रोहन मुजूमदार 

सोशल मीडियावर सध्या राजकीय वॉर जोरदार सुरू आहे. आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी सोशल मीडियावर जोरदार प्रचार सुरू केला आहे. उमेदवाराचा प्रचार, सभांचे प्रक्षेपण, प्रतिस्पर्धी उमेदवाराच्या चुकांवर बोट ठेवणारे व्हिडीओ, संदेश प्रसारित करण्यास सुरुवात झाली आहे. दिवसागणिक ही सोशल मीडिया वॉर रंगत जाणार आहे.

निवडणूक काळात उमेदवार प्रचार सभा, फेऱ्या, मतदारांच्या गाठीभेटींमध्ये व्यस्त असतात. पण सर्वच मतदारांपर्यंत पोहोचणे त्यांना शक्‍य होत नाही. त्यामुळे मागील काही वर्षांपासून निवडणुकांमध्ये सोशल मीडियाचा वापर वाढला आहे. त्यातच फेसबुक, व्हॉट्‌सऍप, ट्‌विटरसारख्या सोशल मीडिया म्हणजे तरुणाईचा जीव की प्राण, संख्येने सर्वाधिक असलेले तरुण मतदार सोशल मीडियाचा वापर करीत असल्याने राजकीय पक्षांनाही त्याची दखल घेणे भाग पाडले आहे. निवडणूक प्रचाराच्या जाहीर सभा, रॅली, रोड शो यासोबतच सोशल मीडियावर देखील राजकीय पक्षांनी लक्ष केंद्रित केले आहे.

राजकीय पक्षांच्या कार्यालयात सध्या एक स्वतंत्र टीम कार्यरत आहे. प्रत्येक पक्ष फेसबुक, ट्‌विटर पेजसह व्हॉटस्‌ऍप ग्रुपवर पक्षाच्या कामांचे, कार्यक्रमांचे फोटेज अपलोड करणे, पक्षाच्या जाहीरनाम्याबाबत माहिती देणे, युजर्सच्या प्रतिक्रियांवर लक्ष ठेवणे, त्यातून युवकांचा कल पाहणे, इतकंच नाही तर पक्षाच्या विरोधातल्या टीकेलाही एफबी, ट्‌विटरसह व्हॉट्‌सऍप ग्रुपवर उत्तर दिले जात आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांसह, अपक्ष उमेदवारांनी सोशल मीडियाचा जोरदार वापर सुरू केला आहे. प्रत्येक पक्षाच्या कार्यालयात तरुणांची फौज फेसबुक, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍप ग्रुपद्वारे पक्षाच्या उमेदवाराचा सातत्याने प्रचार करून सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणाईसह, महिला, पुरुषांपर्यंत पोहोचण्याचा जोरदार प्रयत्न करीत आहे

प्रामुख्याने फेसबुक आणि व्हॉट्‌सऍपचा वापर अधिक प्रमाणावर केला जात आहे. व्हाट्‌सऍपवर एकावेळी 15 ते 20 हजार मतदारांपर्यंत पोहोचाता येते, त्यामुळे प्रमुख नेत्यांच्या सभांचे लाईव्ह प्रक्षेपण, विविध योजना, जाहीरनाम्यातील आश्‍वासनांचे व्हिडीओ, संदेश, उमेदवाराच्या सभा, पदयात्रा, गाठीभेटींचे लाईव्ह प्रक्षेपण केले जात आहे. तर विरोधकांनी यापूर्वी दिलेली आश्‍वासने आणि सद्यस्थिती याचेही व्हिडीओ तयार केले जात आहेत. प्रतिस्पर्धी उमेदवाराला पाणीप्रश्‍न, रस्ते, बेरोजगारी, शेतीमाला हमीभाव नाही, वाढती गुन्हेगारी, वाहतूक समस्या अशा अनेक मुद्द्यांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून घेरण्यात येत आहे. तर आतापर्यंत आणलेले प्रकल्प, त्यामुळे झालेला विकास मतदारांपर्यंत पोहोचवण्यासाठी ट्विटर, इन्स्टाग्राम, युट्युबचाही वापर केला जात आहे.

…अन्यथा खडे फोडण्याची वेळ 
केंद्रात सत्ता यावी यासाठी भाजप आणि कॉंग्रेस या दोन्ही राष्ट्रीय पक्षांची सोशल मीडियावर सध्या कॉंटे की टक्कर आहे. दरम्यान, फेसबुक, ट्‌विटरवर, व्हॉट्‌सऍप करणारी ही तरुणाई मतदानाच्या दिवशी बुथपर्यंत येईल, यासाठीही राजकीय पक्षांना मेहनत घ्यावी लागणार आहे. अन्यथा नव्या सरकारच्या नावाने एफबी, ट्‌विटर, व्हॉट्‌सऍपवरच खडे फोडण्याची वेळ त्यांच्यावर आल्याशिवाय राहणार नाही.

“डोळ्यात तेल घालून’च पोस्ट व्हायरल 
लोकसभा निवडणुकीत प्रचाराचे प्रमुख माध्यम म्हणून वापरण्यात येणाऱ्या सोशल मीडियावर निवडणूक आयोगाची करडी नजर असल्याने चुकीची पोस्ट व्हायरल होणार नाही याकडे सर्वच पक्षांसह उमेदवार, अपक्ष डोळ्यात तेल घालून मगच एखादी पोस्ट, व्हिडीओ व्हायरल करीत आहेत. तर विरोधकांवर करण्यात येणारे आरोप पुराव्यानिशी सोशल मीडियावर पसरवण्यात येत आहे.

स्टीकर्सचा व्हॉट्‌सऍपवर धुमाकूळ 
व्हॉट्‌ऍपवरील स्टीकर हे सध्या लोकप्रिय झाले असल्याने राजकीय पक्षांनी याकडे आपला मोर्चा वळवला आहे. यात “मैं भी चौकीदार, मेरा भारत महान, एक लक्ष्य एक ही नारा नरेंद्र मोदी, सत्यमेव जयते, राजनिती मे कोई पूर्ण विराम नही होता, सबका साथ सब का विकास यही हमारा मंत्र है’, तर भाजप विरोधकांनी “15 लाख देण्याचे आश्‍वासन देऊन फसवणूक करणाऱ्या लबाड सरकारला लाज कशी वाटत नाही? 2 लाख शाळा बंद करून विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही?, ऑनलाइनच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी नाकारणाऱ्या सरकारला लाज कशी वाटत नाही?’ आदी स्टीकर सध्या व्हॉट्‌सऍपवर धुमाकुळ घालत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.