मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (shard pawar) यांच्या दिल्लीतील निवासस्थानी इंडिया आघाडीच्या समन्वय समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भातील महत्त्वाचा निर्णय होण्याची शक्यता आहे. त्या आधीच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शरद पवार यांचे मुंबईतील निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर भेट दिली. सिल्व्हर ओकवर या तिन्ही नेत्यांमध्ये सविस्तर चर्चा झाली.इंडिया आघाडीमध्ये राष्ट्रवादी आणि ठाकरे यांच्या शिवसेनेसह कॉंग्रेस हा राज्यातील एकमेव मोठा पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रीय पातळीवर आघाडी करताना राज्यातील जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्यावर या तिघांत चर्चा झाली असल्याची चर्चा आहे. इतकेच नाही तर मराठा आरक्षणासह राज्यातील इतरही महत्त्वाच्या विषयांवर या बैठकीत खलबते झाली असल्याचेही समजते. राज्यात मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. त्यातच ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांची भेट महत्त्वाची मानली जात आहे. या भेटीमागचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीसाठी शरद पवार मंगळवारी रवाना झाले. त्यानंतर बुधवारी संजय राऊत दिल्लीत जातील. शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने राऊत यांचाही समावेश आघाडीच्या समन्वय समितीमध्ये आहेत. इंडिया आघाडीच्या समन्वय समितीमध्ये एकूण 14 सदस्य आहेत. देशभरातील अनेक महत्त्वाचे नेते या समितीमध्ये आहेत. दिल्लीतील बैठकीमध्ये पुढील वाटचालीबाबत आणि जागा वाटपाच्या सूत्रांबाबत चर्चा होणार आहे. त्यामुळे ही बैठक महत्त्वाची मानली जाते. मराठा आरक्षणावरही चर्चा राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणासाठी जोरदार आंदोलन सुरू आहे. मनोज जरांगे पाटील आजही उपोषणावर ठाम आहे. राज्य सरकारचे सर्व प्रयत्न फेल होत आहेत. त्यामुळे या मुद्यावरही ठाकरे आणि शरद पवार यांच्यात चर्चा झाली. या वर भूमिका स्पष्ट करत राज्य सरकारच्या विरोधात रणनिती ठरवली जाईल.