प्रभात वृत्तसेवा पुणे – महापालिका निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीमधील जागा वाटपांचा तिढा न सुटल्याने अखेर बहुरंगी लढत होणार आहेत. त्यात प्रामुख्याने भाजप- शिवसेना युतीचा तिढा न सुटल्याने ११० जागांवर समोरासमोर लढत होणार आहे, तर महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस- शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि मनसे एकत्र आले असले, तरी मनसेने काँग्रेसच्या समोर तब्बल ४३ जागांवर उमेदवार दिले आहेत. या पक्षांच्या समोर दोन्ही राष्ट्रवादी आमने सामने लढणार असून, आम आदमी पक्षानेही ८६ उमेदवार मैदानात उतरविले आहेत. त्यामुळे पुण्यात दोन्ही राष्ट्रवादी वगळता इतर सर्वच प्रमुख पक्ष एकमेकांच्या समोर लढणार असून, बहुरंगी लढत होणार असल्याचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. महायुतीच नाहीच महापालिका निवडणुकीच्या घोषणेपासून पुण्यात महायुती म्हणून भाजप आणि शिवसेना एकत्र लढणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. मात्र, प्रत्यक्षात या दोन्ही पक्षांमध्ये अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसांपर्यंत जागावाटपाचा तिढा न सुटल्याने हे दोन्ही पक्ष पुण्यात आमने सामने लढणार आहेत. भाजपने सर्वच्या सर्व १६५ जागांवर उमेदवार दिले असून, शिवसेनेने सुमारे ११० उमेदवारांना एबी फाॅर्म दिले आहेत. त्यामुळे हे दोन्ही पक्ष ११० जागांवर एकमेकांच्या समोर असणार आहेत. पुण्यात युतीमध्ये शिवसेनेकडून ३५ जागांची मागणी करण्यात आली होती. मात्र, भाजपकडून अखेरच्या दिवसापर्यंत जास्तीत जास्त १६ च जागा देण्याची भूमिका घेतली. त्यानंतरही अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत ही चर्चा होणार असल्याचे शिवसेनेच्या नेत्यांकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र, एकदा एबी फाॅर्म भरल्यानंतर कोणताही उमेदवार माघार घेणार नाही, असे लक्षात आल्यानंतर या दोन्ही पक्षांनी कोणतीही स्वतंत्र घोषणा केली नाही. आघाडीचा तिढा सुटलाच नाही पुण्यात महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष बाहेर पडल्यानंतर काँग्रेस, मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र येण्याचा निर्णय घेतला. मात्र, मनसेसोबत जाण्यास काँग्रेस थेट तयार नसल्याने शिवसेनेच्या वाट्याला येणाऱ्या जागा मनसेला द्याव्यात, असा निर्णय झाला. मात्र, ही आघाडीची चर्चा अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशीही सुरू असल्याने या तीनही पक्षांनी तब्बल २१० जागांवर उमेदवार दिले आहेत. त्यात प्रामुख्याने मनसेने दिलेले उमेदवार हे काँग्रेसच्या उमेदवारांच्या समोर आले असून, वेगवेगळ्या प्रभागांत सुमारे ५० ठिकाणी या पक्षांचे उमेदवार एकमेकांच्या समोर आले आहेत. आपही मैदानात आम आदमी पक्षाने महाविकास आघाडीत न जाता स्वतंत्र लढण्याची भूमिका घेतली असून, पक्षाकडून शहरात सुमारे ८६ प्रभागांत उमेदवार दिले आहेत. त्यामुळे अनेक प्रभागांत महाविकास आघाडीच्या उमेदवारांसमोर आपचेही उमेदवार असणार असल्याने मतविभाजनाची शक्यता आहे. त्याचा फायदा नेमका कोणाला होणार, हे आगामी काळात स्पष्ट् होणार आहे.