शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील बेट भागात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी कंबर कसली असून, धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांच्या आडून खुलेआम राजकीय शक्तिप्रदर्शन सुरू झाले आहे. यामुळे बेट भागात सध्या ‘जागरण-गोंधळा’च्या नावाखाली राजकीय धांदल उडताना दिसत आहे. ‘होम मिनिस्टर’ ते ‘जागरण-गोंधळ’ गेल्या काही दिवसांपासून बेट भागात विविध कार्यक्रमांची रेलचेल वाढली आहे. नुकतेच कवठे येमाई येथे एका जिल्हा परिषद इच्छुक उमेदवाराने पंचायत समितीच्या इच्छुकासोबत मिळून ‘होम मिनिस्टर’ या लोकप्रिय कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या माध्यमातून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न झाला. या कार्यक्रमाची चर्चा ताजी असतानाच, आता टाकळी हाजी येथे दुसऱ्या एका जिल्हा परिषद इच्छुकाने भव्य ‘जागरण-गोंधळ’ आणि ‘सामूहिक महाप्रसादा’चे आयोजन केले आहे. या कार्यक्रमांच्या माध्यमातून जनसमर्थनाची हवा आपल्या बाजूने वळवण्याची धडपड सुरू आहे. निवडणुकीची अधिकृत आचारसंहिता अद्याप लागू झालेली नाही. याच संधीचा फायदा घेत इच्छुक उमेदवार प्रशासनाची नजर चुकवून अप्रत्यक्षपणे आपला प्रचार करत आहेत. सण, उत्सव आणि धार्मिक विधींचे निमित्त साधून कार्यकर्त्यांची जमवाजमव केली जात आहे. “निवडणूक खर्चाच्या मर्यादेत अडकण्यापूर्वीच हे सर्व कार्यक्रम उरकून घेण्याकडे इच्छुकांचा कल आहे,” अशी चर्चा ग्रामस्थांमध्ये रंगली आहे. कोणाचे पारडे जड ठरणार? या कार्यक्रमांना होणारी गर्दी, उपस्थित राहणारे वरिष्ठ नेते आणि स्थानिक कार्यकर्त्यांचा उत्साह यावरून कोणाचे पारडे जड आहे, याचे अंदाज बांधले जात आहेत. मात्र, अशा प्रकारच्या उत्सवी राजकारणाचा आणि जंगी भोजनाचा मतदारांच्या कौलावर नेमका किती परिणाम होतो, हे येणारा काळच ठरवेल. सध्या तरी बेट भागातील शांतता या राजकीय शक्तिप्रदर्शनामुळे भंग पावली असून, आगामी निवडणुकांपूर्वी ही स्पर्धा आणखी किती टोकाला जाते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.