एकतर्फी प्रेमातून राजकीय नेत्यांना धमकी, अखेर आरोपीला पुण्यातून अटक

पुणे – पुण्यातील काही राजकीय नेत्यांना मागील काही दिवसांपासून जीवे मारण्याची धमकी फोन, मेसेजद्वारे दिली जात होती. धमकी देणारा आरोपी राजकीय नेत्यांकडून खंडणी मागत असल्याचा प्रकार समोर आला होता. अखेर या आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
इम्रान शेख असे या आरोपीचे नाव असून त्याला पुण्यातील घोरपडी परिसरातून अटक करण्यात आली आहे. एकतर्फी प्रेमातून हा आरोपी मुलीच्या नावाने धमकी देत होता. याचा संबंधित मुलाला त्रास व्हावा यासाठी तो असे काम करत होता. सध्या पोलिस आरोपीची चौकशी करत असून यातून अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
या तीन नेत्यांना दिली होती धमकी
आरोपी इम्रान शेखने मनसे नेते वसंत मोरे यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी दिली होती. वसंत मोरे यांच्या मुलाचे बनावट विवाह सर्टिफिकेट बनवून 30 लाख रुपये दे, अन्यथा मुलाला जीवे मारून टाकू, अशी धमकी दिली होती.
पुण्यातील काँग्रेसचे माजी नगरसेवक अविनाश बागवे यांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. ‘निवडणुकीला उभे राहू नका, अन्यथा गोळ्या घालून मारू’ अशी धमकी देण्यात आली होती.
तर आमदार महेश लांडगे यांना ‘परिवर्तन’ हेल्पलाईनच्या मोबाईल क्रमांकावर 30 लाखाची खंडणी दे, अन्यथा जीवाला धोका आहे, अशा आशयाचा मेसेज पाठवण्यात आला होता.





