‘महाराष्ट्राची प्रतिमा आता डागाळली’ म्हणत सोम्मय्या प्रकरणावर राजकीय नेत्यांचा हल्लाबोल

मुंबई : भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ लोकशाही वृत्तवाहिनीवर व्हायरल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. या व्हिडीओमुळे भाजपसह सर्वच पक्षाचे नेते यावर बोलताना दिसत आहे. तर दुसरीकडे किरीट सोमय्या यांनी यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून याविषयीच्या चौकशीची मागणी केली आहे.
दरम्यान, अनेक राजकीय नेत्यांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया व्यक्त करत किरीट सोमय्यांवर जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेससह सर्वच पक्षाच्या नेत्यांनी सोमय्या यांच्यावर टीका केली आहे.
“महाराष्ट्राची प्रतिमा आता डागाळली” – नाना पटोले
याविषयी नाना पटोले यांनी “या सगळ्या प्रकरणावर काय बोलणार? भाजपाचं राजकारण घाणेरडं झालं आहे. कधी नव्हे ते या गोष्टी समोर येत आहे. २०१४ ला देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आल्यापासून राजकारणाचा स्तर घसरला आहे. महाराष्ट्राच्या जनतेला हे दाखवलं गेलं आहे. महाराष्ट्राची प्रतिमा आता डागाळली आहे. व्हिडीओची सत्यता पडताळल्यानंतरच प्रतिक्रिया देता येईल. मात्र राज्यातल्या सरकारची मानसिकता विचारांना कलंक लावणारी आहे.”
“पुरुषांना चारित्र्य नसतं का?”- अयोध्या पौळ
“लोकप्रतिनिधी कुठलेही असतील त्यांनी चारित्र्य सांभाळणं आवश्यक असतं. राजकारणी मग तो महिला असो की पुरुष त्याने आपली प्रतिमा जपावी लागते. एक महिला म्हणून मी सांगू इच्छिते की महिलांवर कायम बोललं जातं की ही अशी आहे आणि तशी आहे. पुरुषांना चारित्र्य नसतं का? हा प्रश्न निर्माण होतो. लोकप्रतिनिधी म्हणून चार लोकांचं प्रतिनिधीत्व करत असतो तेव्हा आपण काय उदाहरण ठेवतो? “असा प्रश्न अयोध्या पौळ यांनी म्हटलं आहे.
“भाजपानेच या क्लिप दिल्या आहेत की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी?”- वैभव नाईक
एक बाजू अशी आहे की अशा प्रकारच्या क्लिप ज्या समोर आल्या आहेत. किरीट सोमय्या सातत्याने दुसऱ्यांवर आरोप करत आहेत. अनिल परब यांच्यावरही त्यांनी आरोप केले. अजित पवारांवर आरोप केले, हसन मुश्रीफ यांच्यावर आरोप केले. त्यांच्यावरही अनेक आरोप केले. राष्ट्रवादीच्या अनेक लोकांवरही आरोप केले. राष्ट्रवादी सत्तेत येण्यासाठी डील झालं आहे का? भाजपानेच या क्लिप दिल्या आहेत की राष्ट्रवादीच्या नेत्यांनी दिल्या आहेत? असे प्रश्न वैभव नाईक यांनी उपस्थित केले आहेत.
“या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे” – एकनाथ खडसे
“मी व्हिडीओ पाहिलेला नाही. मात्र हा अश्लील व्हिडीओ आहे असं कळतं आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे” असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.





