प्रभात वृत्तसेवा विंझर – राजगड तालुक्यातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून आपली राजकीय ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे. नुकतीच वेल्हे येथे पार पडलेल्या एका महत्त्वाच्या आढावा बैठकीत, चळवळीतील इच्छुक उमेदवारांचा आढावा घेऊन दोन गणांसाठी नावे निश्चित करण्यात आली आहेत. या निर्णयामुळे तालुक्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे आहेत. वेल्हे येथील आढावा बैठकीत सर्वानुमते खालील दोन गणांसाठी इच्छुक उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. पानशेत गण: कल्पना विनोद गायकवाड, विंझर गण: प्रदीप मनोहर कांबळे (आरपीआय युवकाध्यक्ष, राजगड-वेल्हे),यावेळी कार्यकर्त्यांनी आरपीआयचे युवकाध्यक्ष प्रदीप मनोहर कांबळे यांच्या नावावर विंझर गणातून विश्वास व्यक्त केला आहे. वांगणी गणाची उत्सुकता शिगेला! वांगणी गणातून मात्र अनेक जण इच्छुक असल्याने उमेदवाराच्या नावाची घोषणा त्वरित करण्यात आली नाही. या गणाकरिता इच्छुक उमेदवारांची कसून चाचपणी केल्यानंतर आगामी आठ दिवसांत उमेदवाराचे नाव जाहीर केले जाईल, असे बैठकीत निश्चित करण्यात आले. असले तरी वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हा पश्चिमचे युवक अध्यक्ष अभिषेक वैराट, आरपीआय अध्यक्ष कुंदन गंगावणे यांचे नाव चाचपणीत आघाडीवर आहे . सर्वानुमते निर्णय हा संपूर्ण निर्णय वेल्हे-राजगड तालुक्यातील सर्व आंबेडकरी चळवळीतील नागरिकांच्या आणि पदाधिकाऱ्यांच्या वतीने सर्वानुमते घेण्यात आला आहे.या बैठकीला राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील आंबेडकरी चळवळीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांमध्ये प्रामुख्याने कुंदन गंगावणे (आरपीआय वेल्हे तालुका अध्यक्ष), विलास गायकवाड (उपाध्यक्ष), नथू गायकवाड (वेल्हे माजी सरपंच), विनोद दादू गायकवाड (जिल्हा संघटक), विनोद निवृत्ती गायकवाड (पॅंथर जिल्हाध्यक्ष), दिनेश गायकवाड (भा. बौद्ध महासभा पुणे जिल्हा पूर्व संघटक) अभिषेक वैराट (वंचित बहुजन आघाडी पुणे जिल्हा पश्चिम अध्यक्ष), रविराज गायकवाड (भा. बौद्ध महासभा वेल्हे सरचिटणीस), यशवंत गायकवाड (रयत फाउंडेशन संस्थापक), अमित शिंदे (सचिव) तसेच संतोष गायकवाड, दामाजी गायकवाड, विलास गायकवाड, निखिल गायकवाड, सदाशिव गायकवाड, संजय गायकवाड, कैलास गायकवाड, नितीन गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.या निर्णयामुळे आंबेडकरी चळवळ वेल्हे-राजगड तालुक्यात मोठी राजकीय तयारी करत असल्याचे स्पष्ट झाले असून, आगामी निवडणुकीत या चळवळीच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागून राहील.