प्रभात वृत्तसेवा सासवड – सासवड नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल झालेल्या उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी (ता. १८) संथगतीने सुरू झाली. ही प्रक्रिया अखेर बुधवारी रात्री उशिरापर्यंत चालु राहिली. निवडणूक निर्णय अधिकारी सतीश थेटे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या काटेकोर छाननीत अनेक अर्जांवर आक्षेप घेतल्यामुळे मोठी उलथापालथ दिसून आली.नगराध्यक्षपदासाठी दाखल झालेल्या एकूण १५ अर्जांपैकी ६ अर्ज वैध, तर ९ अर्ज अवैध ठरविण्यात आले. सहाय्यक निवडणूक अधिकारी डॉ. कैलास चव्हाण यांनी बुधवारी (ता. १९) दुपारी ही माहिती जाहीर केली. वैध ठरलेल्या नगराध्यक्षपदाच्या अर्जांमध्ये प्रमुख पक्षांचे उमेदवार पुढीलप्रमाणे आहेत : भाजप : माजी नगराध्यक्षा आनंदीकाकी जगताप, शिवसेना : माजी नगरसेवक सचिन भोंगळे, महाविकास आघाडी शिवसेना (उबाठा) : अभिजित जगताप, अपक्ष : माजी उपनगराध्यक्ष वामन जगताप, दत्तात्रेय घाटे, निकिता धोत्रे. प्रभाग ११ ‘अ’ मध्ये वादाची ठिणगी छाननीदरम्यान मोठी चर्चा घडवणारी घटना प्रभाग ११ ‘अ’मध्ये पाहायला मिळाली. येथे भाजपच्या उमेदवार राजश्री वैभव इनामके यांचा अर्ज पक्षाची अधिकृत उमेदवारी वेळेत न मिळाल्याने अवैध ठरविण्यात आला. परिणामी या प्रभागात शिवसेनेच्या उमेदवार हेमलता मिलिंद इनामके यांचा एकमेव वैध अर्ज शिल्लक राहिला आहे. या निर्णयाविरोधात भाजपकडून न्यायालयात दाद मागण्याची तयारी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे या प्रभागातील निवडणूक लढत कायद्याच्या कक्षेतून अधिक गाजण्याची शक्यता आहे. माध्यमांकडे माहिती देण्यात दिरंगाई छाननी प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असताना, निवडणूक प्रशासनाकडून माध्यमांना वेळेत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही. रात्री साडेबारा ते अडीचच्या सुमारास छाननी पूर्ण झाल्याची खात्रीशीर माहिती उपलब्ध असूनही ती पत्रकारांना न देण्यात आल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. निवडणूक प्रक्रियेत पारदर्शकता राखली पाहिजे, अशी मागणी पत्रकारांनी व्यक्त केली आहे.