पिंपरी – महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजला असून शहरात राजकीय कोलांट्याउड्यांना सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी भाजपच्या काही नेत्यांनी अजित पवारांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर आता अजित पवारांच्या राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील काही बड्या नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. तब्बल 22 नेत्यांना भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश दिला आहे. गेल्या काही दिवसांपासून याबाबत चर्चा सुरू होती. भाजप आमदार महेश लांडगे यांनी याबाबत पुढाकार घेतला आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने भाजपातील काही माजी नगरसेवक आणि पदाधिकार्यांचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यात बारामती गेस्टहाउसमध्ये प्रवेश करुन घेतला. याला जोरदार प्रत्युत्तर देत भाजपने शनिवारी 22 सर्वपक्षीय नेत्यांना पक्षात प्रवेश दिला असल्याचे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले. यावेळी भाजपचे चिंचवडचे आमदार शंकर जगताप आणि भाजपचे शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे उपस्थित होते. महापालिका निवडणूक आचार संहिता सुरू झाली आहे. दि. 15 जानेवारी 2026 रोजी मतदान आणि दि. 16 जानेवारी रोजी निकाल घोषीत होईल. महापालिका निवडणुकीत भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गट स्वबळावर लढणार आहेत. महायुतीततील मित्र पक्षच एकमेकांच्या पक्षांना सुरुंग लावत आहेत. विधानसभा निवडणुकीपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि भाजपचे आमदार महेश लांडगे यांच्यातील वाद सार्वजनिकरित्या दिसून येत आहेत. राज्याच्या अणि केंद्राच्या सत्तेत मित्र पक्ष असलेल्या या दोन पक्षांच्या स्थानिक पातळीवर नेत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कटुता आहे. राजकीय शह आणि मात देण्याचा हा खेळ गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. भाजपमधील पदाधिकार्यांना आपल्या पक्षात घेत आणि भाजप आमदाराच्या विरोधात रान उठवून देणार्यांना पुन्हा पक्षात घेत अजित पवार यांनी भाजप आमदारांना तगडा झटका दिला होता. त्यानंतर आता भाजपने राष्ट्रवादी आणि शिवेसनेच्या नेत्यांना पक्षात समाविष्ट करुन घेत त्याला प्रत्युत्तर दिले आहे. विरोध तरीही पक्षप्रवेश गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतील माजी नगरसेवकांना पक्ष प्रवेश देण्याच्या चर्चा सुरु होत्या. यावरुन भाजपचे स्थानिक नेते संतप्त होते. या नेत्यांनी उघड-उघड याचा विरोधही केला होता. पक्षप्रवेशावेळीच शहरात भाजपच्या पदाधिकार्यांनी विरोध प्रदर्शने केली तरी देखील 22 नेत्यांचा पक्षप्रवेश झाला. यामुळे स्थानिक पातळीवरील राजकीय समीकरणे तर बदलणारच आहे आणि काही भाजपच्या नेत्यांचे राजकीय अस्तित्वच धोक्यात येणार आहे.