लोणावळा – लोणावळा नगरपरिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या दिवशी मोठा राजकीय भूकंप झाल्याचे चित्र उभे राहिले आहे. शहरात दिवसभर नाट्यमय घडामोडी घडत राहिल्या. काही प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी अचानक माघार घेतल्याने अनेक समिकरणे बदलली असून, नगराध्यक्षपदासाठी आता चौकोनी लढत निर्माण झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी गिरीश कांबळे (भाजप), राजेंद्र सोनवणे (राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार), सूर्यकांत वाघमारे (शिवसेना-आरपीआय युती), राजेंद्र दिवेकर (शिवसेना ठाकरे गट) हे चार चेहरे असून या चौघांमध्ये थेट सामना रंगणार आहे. नगरसेवक पदांसाठी भाजपच्या तीन, शिवसेनेच्या एका उमेदवारासह काही अपक्षांनी माघार घेतली आहे. विशेषतः प्रभाग क्र. १२ मध्ये भाजपचे अधिकृत उमेदवार अभय पारखे यांनी अर्ज मागे घेतला असून, या प्रभागात भाजपने एका अपक्ष उमेदवारास समर्थन दिल्याची माहिती मिळत आहे. अर्ज माघारीची प्रक्रिया संपल्यानंतर आता लोणावळ्यातील निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले आहे. नगराध्यक्षपदासाठी चारही उमेदवार कडवी लढत देत असताना काही प्रभागांतील बिनविरोध निवडीमुळे राष्ट्रवादीचा आत्मविश्वास वाढला आहे. आगामी दिवसांत प्रचारयुद्ध तापणार असून, या निवडणुकीत प्रत्येक मत निर्णायक ठरणार आहे. राष्ट्रवादीचे दोन उमेदवार बिनविरोध प्रभाग क्र, दोन मध्ये भाजपच्या दीपिका इंगुळकर यांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या अनिता अंबोरे यांची निवड बिनविरोध झाली आहे. तर प्रभाग क्र. तीन मध्ये भाजपच्या अश्विनी अरुण लाड आणि शिवसेना-आरपीआय युतीचे राजेश देसाई यांनी अर्ज मागे घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीच्या श्वेता गायकवाड यांचा विजय निश्चित झाला आहे. प्रभाग क्र. सातचे उमेदवार देविदास कडू यांच्या समोरील अपक्षाने माघार घेतल्याने त्यांची निवडही बिनविरोध मानली जात आहे.