बेंगळूरु: कर्नाटकमधील काँग्रेस पक्षात गेले काही महिने सुरू असलेल्या मुख्यमंत्रीपदाच्या ‘खुर्ची युद्धा’ला रामनगरचे काँग्रेस आमदार एच.ए. इक्बाल हुसैन यांच्या ताज्या विधानामुळे पुन्हा एकदा धार आली आहे. उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार (DK Shivakumar) हे ६ जानेवारी रोजी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारतील, असा खळबळजनक दावा हुसैन यांनी केला आहे, ज्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. काँग्रेसमध्ये सध्या मुख्यमंत्री सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि उपमुख्यमंत्री डीके शिवकुमार यांच्या समर्थकांमध्ये मुख्यमंत्रिपदावरून संघर्ष पेटलेला आहे. याच पार्श्वभूमीवर, डीके शिवकुमार यांचे कट्टर समर्थक असलेले आमदार हुसैन यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले, “६ जानेवारीला ते (डीके शिवकुमार) मुख्यमंत्री होण्याची ९९ टक्के शक्यता आहे.” हुसैन यांनी मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांना आवाहन करत म्हटले आहे की, त्यांनी आता डीके शिवकुमार यांच्यासाठी मुख्यमंत्रिपदाची जागा मोकळी करावी आणि शिवकुमार यांना संधी द्यावी. ६ जानेवारीच्या तारखेबद्दल विचारले असता, “माहित नाही. ही फक्त एक संख्या आहे. ६ किंवा ९ जानेवारी या दोन तारखांची चर्चा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. काही महिन्यांपूर्वी पक्षश्रेष्ठींनी हस्तक्षेप केल्यावर सिद्धारामय्या आणि शिवकुमार यांनी एकत्र नाश्ता करून तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, हुसैन यांच्या या नव्या दाव्यानंतर, कर्नाटकमधील राजकीय वातावरण निश्चितच तापणार आहे. दरम्यान, भाजपचे खासदार आणि रेल्वे राज्यमंत्री व्ही. सोमन्ना यांनी मुख्यमंत्रीपदासाठी गृहमंत्री जी. परमेश्वर यांना पाठिंबा दर्शविला आहे. “परमेश्वर केवळ गृहमंत्री राहतील, असे मी स्वप्नातही पाहिले नव्हते. मीच नव्हे, तर तुमकूरूतील जनतेला त्यांना मुख्यमंत्री म्हणून बघायचे आहे,” असे सोमन्ना यांनी तुमकूरू येथील एका कार्यक्रमात म्हटले.