काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप; चार आमदारांचे राजीनामे

गांधीनगर : मध्य प्रदेशात काँगेसला घरघर लागलेली असतानाच  गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्यसभेची निवडणूक जवळ असताना काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिला आहे. या चारही आमदारांचे राजीनामे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी मंजूर केले आहे. सोमवारी त्या चार आमदारांची नावे विधानसभेत जाहीर करणार असल्याचे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांनी सांगितले.

गुजरात राज्यसभेच्या चार जागांसाठी  26 ‘मार्च’ला मतदान होणार आहे. पण त्या आगोदरच काँग्रेसच्या चार आमदारांनी राजीनामा दिल्यामुळे काँग्रेसचे धाबे चांगलेच दणाणले आहे. या चारही आमदारांनी आपले राजीनामे विधानसभा अध्यक्ष राजेंद्र त्रिवेदी यांना सादर केले आहे.

या राजीनामा प्रकरणामुळे काँग्रेसचं संख्याबळ 73 वरुन 69वर घसरलं आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या एकूण 182 जागा आहेत. मतदानाची आकडेवारी पाहता काँग्रेसला आता राज्यसभेच्या चार जागांपैकी एकच जागा जिंकणे शक्य होणार आहे.

तर भारतीय जनता पक्ष (भाजप)च्या तीन जागा निवडून येऊ शकतात.  गुजरातमध्ये एका जागेसाठी 36 मतांची गरज असते. त्यामुळे काँग्रेसची दुसरी जागा अवघ्या तीन मतांनी धोक्यात आली आहे.  

सध्या भाजपकडे 103 आमदारांचे संख्याबळ आहे. तिसऱ्या जागेसाठी भाजपला फक्त 5 मतांची आवश्यकता आहे. ‘भारतीय ट्रायबल पार्टी’चे दोन, राष्ट्रवादीचा एक, तर एक अपक्ष आमदार आहे.

भाजपकडून अभय भारद्वाज, नरहरी अमिन, रमिला बारा यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. चार आमदारांनी राजीनामा दिल्यानंतर काँग्रेसने आपल्या 24 आमदारांना जयपूरला रवाना केले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.