प्रभात वृत्तसेवा पिंपरी – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रमुख पक्षांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती पूर्ण झाल्या आहेत. त्यानंतरही आयाराम गयारामांमुळे शहरातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत आहेत. आयात उमेदवारांना मोठ्या प्रमाणात विरोध होत असल्याने शहरातील राजकीय वातावरण अधिकच तापले आहे. उमेदवारीच्या अंतिम यादीला अद्याप शिक्कामोर्तब न झाल्याने आणि ‘अंतिम क्षणीच घोषणा’ करण्याचे धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे मुलाखत दिलेल्या इच्छुकांची धडधड वाढली आहे. उमेदवारी मिळाली नाही तर पुढील पाऊल कुठे टाकायचे, हा प्रश्न अनेकांच्या समोर उभा ठाकला आहे.पिंपरी-चिंचवडमध्ये इच्छुकांचा ओघ प्रामुख्याने भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे अधिक असल्याने या पक्षांच्या नेत्यांसमोर निवडीचा मोठा पेच निर्माण झाला आहे. एकाच प्रभागात जुने, माजी आणि नवे, असे अनेक दावेदार असल्याने निर्णय घेताना रोष आणि असंतोषाला सामोरे जाण्याची वेळ दोन्ही पक्षांवर येण्याची शक्यता आहे. पर्यायी पक्षांची चाचपणी उमेदवारीच्या शर्यतीत असलेल्या अनेकांनी पर्याय म्हणून इतर पक्षांचे दरवाजे उघडे ठेवले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार आणि शरदचंद्र पवार या दोन गटांकडे इच्छुकांची गर्दी वाढताना दिसते. राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी आणि संधी हातातून जाऊ नये म्हणून काही इच्छुकांकडून पक्षांतराचीही चाचपणी सुरू आहे. घोषणा कधी? मुलाखत दिलेल्या इच्छुकांचे लक्ष आता उमेदवारीच्या घोषणेकडे लागले आहे. काही इच्छुकांनी दोन्ही प्रमुख पक्षांकडे उमेदवारीसाठी अर्ज करून ‘सेफ प्लॅन’ आखला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, लवकरच भाजप आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या उमेदवारीची घोषणा होण्याची शक्यता आहे. मात्र तोपर्यंत इच्छुकांची प्रतीक्षा आणि धाकधूक कायम राहणार आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून उमेदवार निवडीत बारकाईने छाननी केली जात असून, अनावश्यक गर्दी टाळण्यावर भर दिला जात आहे. काही प्रभागांत सक्षम आणि लढत देण्याची ताकद असलेल्या व्यक्तींचे पक्षप्रवेशही सुरू आहेत. त्यामुळे त्या गटाकडे निवडीसाठी तुलनेने अधिक पर्याय उपलब्ध असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे, एकनाथ शिंदे आणि उबाठा गटांच्या या दोन्ही शिवसेनेला संभाव्य बंडखोरीचा सामना करण्याची चिन्हे फारच कमी दिसत आहेत. पक्षांतर करून आलेल्या काही मोठ्या नेत्यांना निवड प्रक्रियेपासून दूर ठेवण्यात आल्याने ऐनवेळी असंतोष उफाळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. उर्वरित पक्षांमध्ये उमेदवार निवड तुलनेने कमी किचकट ठरण्याची चिन्हे असली, तरी प्रमुख पक्षांच्या निर्णयांकडेच सध्या सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.महापालिकेच्या रणसंग्रामात अंतिम तिकीट कुणाच्या गळ्यात पडते, यावरच पुढील राजकीय गणिते ठरणार असल्याने येत्या काही दिवसांत शहरातील राजकीय हालचाली आणखी वेग घेण्याची चिन्हे स्पष्ट आहेत.