मुंबई : मतदार यांद्यामध्ये घोळ आहे. मतदार याद्यांमध्ये दुबार नावे आहे. बोगस मतदार याद्या आहेत, या फक्त एखाद्या मतदार संघात नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात आहेत, असा आरोप राज्याचे समाजकल्याण मंत्री आणि शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी केला आहे. दुबार, तिबार नावे आणि बोगस नावं काढलीच पाहिजे, असेही मंत्री शिरसाट यांनी म्हटले आहे. यामुळे महाविकास आघाडी आणि मनसेच्या सत्याचा मोर्चाला अधिक बळ मिळाले असल्याचे खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही मतदार याद्यांचे वास्तव समोर ठेवले आहे. आम्ही मतदार याद्या दाखवल्यानंतर माध्यमं तिथे जाऊन दाखवत आहेत की या ठिकाणी कोण राहात आहे. आम्ही वास्तवच समोर ठेवत आहोत. सत्तेतील दोन घटक पक्षांनी देखील मान्य केले आहे की, मतदार याद्यांमध्ये घोळ आहे. अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनीही मान्य केले आहे की, मतदार याद्या बोगस आहेत. त्यामध्ये घोळ आहे. आम्ही काय वेगळं सांगत आहोत, असा सवाल करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना कैचीत पकडले. सत्याचा मोर्चा हा मोर्चा एकट्या निवडणूक आयोगाच्याच विरोधात नाही तर जे लोक आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. – बाळासाहेब थोरात, कॉंग्रेस नेते