पिंपरी, दि. ३० (प्रतिनिधी) – महापालिका निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याची मंगळवारी (दि. ३०) शेवटची मुदत होती. दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आली होती. बंडखोरी होऊ नये यासाठी भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेसने अधिकृत उमेदवार जाहीर केले नाही. थेट निवडणूक कार्यालयात शेवटच्या एक तासात ठरलेल्या उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. तर अर्ज भरण्याची मुदत संपल्यानंतरही अद्याप एकाही पक्षाने अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर राजकीय गुंता झाला असून खासदार, आमदार, शहराध्यक्ष, उमेदवार आणि कार्यकर्ते यापैकी कोणाचाच कोणाला ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना (उबाठा) शिवसेना (शिंदे गट), काँग्रेस आणि आपच्या वतीने तयारी करण्यात येत होती. त्यासाठी कार्यकर्ते गेल्या वर्षभरापासून तयारी करत होते. पक्षाचे तिकीट तुलाच मिळणार असे सांगत भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वच इच्छुकांना अर्ज भरायला लावले. मात्र, शेवटच्या क्षणापर्यंत एबी फॉर्म दिले नसल्याने तिकीट आपल्यालाच मिळणार या अतिआत्मविश्वासात इच्छुक राहिले. मात्र, शेवटच्या क्षणी भलत्यालाच एबी फॉर्म दिल्याने अनेक इच्छुकांच्या स्वप्नावर पाणी फिरले आहे. तर यामुळे शहरातील राजकीय वातावरण तापले असून एकाही पक्षाकडून अद्याप अधिकृत उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली नाही. दरम्यान, तिकीट न मिळाल्याच्या रागातून राष्ट्रवादी, भाजपमधील निष्ठावंत आणि इतर कार्यकर्त्यांनी रान पेटवायला सुरूवात केली आहे. त्याला सामोरे जाताना पक्षातील वरिष्ठांच्या नाकीनऊ आल्याचे चित्र आहे. तर अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर होत नसल्याने मोठा राजकीय गुंता झाला आहे.