पुणे – भाजप नेते खासदार गिरीश बापट यांचे आज निधन झाले आहे. मागील काही दिवसांपासून बापट यांची प्रकृती चिंताजनक होती. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. भाजप शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांनी खासदार गिरीश बापट यांचे निधन झाल्याची माहिती माध्यमांना दिली.
राजकीय कारकीर्द
गिरीश बापट हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते. 1983 ते पहिल्याच प्रयत्नात पुणे महानगरपालिकेत नगरसेवक झाले. सलग तीन वेळा ते नगरसेवकपदावर राहिले होते. त्यानंतर 1995 मध्ये त्यांनी आमदारकीची निवडणूक लढविली आणि पुढे 2014 पर्यंत ते पाच वेळा निवडून आले. 2014 मध्ये गिरीश बापट यांना लोकसभा निवडणूक लढवायची होती. मात्र पक्षाने अनिल शिरोळे यांना उमेदवारी दिल्यामुळे त्यांना संधी मिळू शकली नाही.
अखेर 2019 मध्ये बापटांनी खासदारकीचे तिकीट मिळवले आणि निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या मोहन जोशी यांचा तब्बल 96 हजार मतांनी पराभव केला. याशिवाय त्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात अनेक खात्यांचे मंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री म्हणूनही काम केले होते.
कसबा पोटनिवडणुकीत सहभाग
दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसब्यात पोटनिवडणुक झाली. यावेळी प्रकृती ठीक नसताना देखील ते ऑक्सिजन लावून आणि व्हिलचेअरवर बसून भाजपच्या मेळाव्यात उपस्थित राहिले होते. याप्रकरणी विरोधी पक्षाने भाजपवर टीकाही केली होती. तसेेच कसबा पोटनिवडणुकीत कॉंग्रेसचे आमदार रविंद्र धंगेकर हे विजयी झाल्यानंतर त्यांनी गिरीश बापट यांची भेट घेतली होती.