Pimpri : अस्तित्वाच्या लढाईसाठी मावळात राजकीय रणकंदन

वडगाव मावळ : मावळ तालुक्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे पडघम वाजू लागले आहे. महायुतीचे संभाव्य स्वरूप आणि जागावाटपावरून राजकीय हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि भाजपा या दोन्ही पक्षांनी युतीसाठी सकारात्मक भूमिका घेतली आहे. तरी देखील मतभेदांचे जोरदार वारे सुटले आहे.
आमदार सुनील शेळके यांनी भाजपा शहराध्यक्ष संतोष दाभाडे यांना नगराध्यक्षपदासाठी पाठिंबा दर्शविल्यामुळे, भाजपाकडून तीव्र नाराजी व्यक्त झाली. माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांनी याला उत्तर देताना भाजपात दोन गट नसल्याचा दावा केला आणि युती सर्वच नगरपरिषद व नगरपंचायतींमध्ये व्हायला हवी, असा आग्रह धरला. येत्या दोन-तीन दिवसांत शहर व तालुका पातळीवर नेत्यांची याबाबत बैठक होणार आहे. त्यावेळी जागावाटप हा निर्णायक किंवा कळीचा मुद्दा ठरणार आहे.
निवडणूक रंगतदार होण्याची शक्यता
तळेगाव, लोणावळा व वडगावमधील आगामी नगरपरिषदा आणि ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मावळातील सर्वपक्षीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. गेली तीन वर्षे रखडलेली निवडणूक आता डिसेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आठ वर्षांनी नगरसेवक होण्याचे स्वप्न बाळगणारे कार्यकर्ते आणि महिला इच्छुक मोठ्या संख्येने इच्छुक आहेत.
यामुळे तिकीटवाटप हे एक जटिल गणित ठरणार आहे. आरक्षणामुळे 23 जागांवर महिलांसह विविध गटांसाठी आरक्षित जागा आहेत. त्यामुळे महायुती यशस्वी होणार की बंडखोरीची कीड लागणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. जागांची संख्या २३ असताना इच्छुकांची संख्या २०० च्या घरात असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. त्यामुळे तालुक्यातील नेत्यांना निर्णय घेणे म्हणजे अवघड जागेचे दुखणे ठरणार आहे.
उमेदवारीचे निकष काय असणार?
महायुती कायम राहणार की फाटाफूट होणार, हे ठरवणारे प्रमुख निकष म्हणजे जागावाटप असणार आहे. उमेदवारीचे निकष आणि स्थानिक पातळीवर राजकीय समजूतदारपणा महत्वाचे ठरणार आहे. पक्षासाठी निष्ठावान कार्य करणाऱ्यांना संधी द्यावी की मनी-मसल पॉवरवाल्यांना प्राधान्य द्यावे, या चर्चांना उधाण आले आहे.
दुसरीकडे, आमदार शेळके यांचे वक्तव्य आणि त्यावरून झालेल्या प्रतिक्रिया सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने राजकीय वातावरण निवडणुकीच्या आधीच अधिक तापले आहे. दरम्यान, भाजपाच्या एका पदाधिकाऱ्याच्या वर्तनावर प्रश्न उपस्थित केल्यावर माजी मंत्री बाळा भेगडे यांनी त्याला योग्य समज दिला जाईल, असे स्पष्ट केले. सर्वसामान्य जनतेसाठी पारदर्शक आणि मूल्याधिष्ठित राजकारण करण्याची अपेक्षा वाढीस लागली आहे.
महायुती विरुद्ध महाआघाडीच्या दिशेने रणनीतीची वाटचाल
बेरजेच्या राजकारणातून एकेकाळचे प्रतिस्पर्धी एकत्र येण्याचे प्रयत्न
नातेसंबंधांमुळे गोंधळलेले स्थानिक राजकारण आणणार रंगत
निवडणूक लढतींच्या केंद्रस्थानी असणार प्रतिष्ठेचा संघर्ष
वातावरणनिर्मितीत राष्ट्रवादी आमदार आघाडीवर, भाजपाची प्रतिक्रिया तीव्र
विकासकामांचा प्रचार, इच्छुकांची गर्दी, तिकीटवाटपाचे आव्हान
उमेदवारीसाठी निष्ठावानाचा की धनशक्तीचा होणार विजय?





