पुणे- मंत्रालयासमोर विषप्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पोलीसपत्नी संगीता डवरे यांची मृत्यूची झूंज अपयशी ठरली आहे. त्यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु होते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत असताना त्यांचा अपघात झाला होता. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर योग्य उपचार केले नाहीत, असा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर डॉक्टरांवर कारवाई करा, अशी तक्रार संगीता यांनी केली होती. मात्र या संदर्भात कोणतीही कारवाई झाली नाही त्यामुळे त्यांनी थेट मंत्रायलासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. संगीता यांचे पती नवी मुंबई पोलीस दलात कार्यरत होते. त्यावेळी पामबीच मार्गावर लावलेल्या नाकाबंदीच्या वेळी भरधाव इनोव्हा कारने थेट बॅरिगेट्स तोडले होते. याच भरधाव गाडीखाली संगीता यांचे पती चिरडले गेले. कार चालक हा मद्यप्राशन करुन होता. त्यामुळे कारचालकावर कठोर कारवाई व्हायला हवी होती. मात्र त्याप्रमाणे कारचालकावर कोणतीही कठोर कारवाई करण्यात आली नाही.