सोरतापवाडी – हवेली तालुक्यातील सर्व पोलीस पाटील कोरोना विषाणू संसर्ग रोखण्यासाठी आहोरात्र कामात उतरलेले आहेत. सरकार व ग्रामस्थ यामधील दुवा म्हणून ओळखले जाणारे पोलीस पाटील सातत्याने लोकांमध्ये सहभागी होऊन लोकांना मार्गदर्शन करून या संसर्गाविषयी माहिती देऊन लोकांची मानसिक स्थिती मजबूत करण्याचा प्रयत्न करीत आहेत.
शासकीय प्रतिनिधी म्हणून प्रथमदर्शी गावामध्ये राहणारा गावचा पोलीस पाटीलच असतो, त्यामुळे आपली जबाबदारी ओळखून सध्या हवेली तालुक्यातील पोलीस पाटील नागरिकांना या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर औषध फवारणी, स्वच्छता राखणे, तोंडाला रुमाल-मास्क लावणे अशा अनेक माध्यमातून जनजागृती करीत आहेत.
गावात नवीन आलेल्या लोकांविषयी माहिती गोळा करून आरोग्य खात्याला माहिती देणे याबाबतही पुढाकार घेत आहेत. गावातील करोना विषाणू संसर्ग कमिटीमध्ये शासकीय प्रतिनिधी म्हणून तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, आरोग्य विभाग प्रतिनिधी, सरपंच, उपसरपंच अथवा सदस्य असून, हे सर्व मिळून काम करीत आहेत.